धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यातील पाणी व चारा टंचाईच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांचे अध्यक्षतेखाली आज 24 मे रोजी जिल्हयाअंतर्गत टँचाईग्रस्त गावांत टँकरव्दारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे,टँकर मंजूरीविषयक प्रकरणे,विंधन विहीर/विहीर अधिग्रहण याबाबतची सदयस्थिती,पाटंबधारे प्रकल्पातील उपलब्ध व उपयुक्त पाणीसाठयाची सदयस्थिती,लहान/मोठी पशुधन यांच्या संख्येप्रमाणे आवश्यक व उपलब्ध असलेला चारा या अनुषंगीक बाबींचे संदर्भात कार्यालय प्रमुख यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने,जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.गौरीशंकर हूलसुरे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.वाय.बी.पुजारी,वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ.मेघा शिंदे,जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मोहन सरवदे व संबंधित विभाग प्रमुख या बैठकीस उपस्थित होते.     

या बैठकीत प्रामुख्याने जिल्ह्यातील पाणी टंचाईची परिस्थिती विचारात घेवून शहरी भागासोबतच गाव, वाड्या-वस्त्यांवर पाणी पुरवठा करण्यासाठी विहिरी,विंधन विहीरींचे अधिग्रहण,नळ योजनांची दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळ योजना,नवीन विंधन विहिरी,टँकरद्वारे पाणी पुरवठा आदींचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारणार्थ ऑक्टोबर 2023 ते जून 2024 या कालावधीतील विविध उपाययोजनांचा समावेश असलेला पाणी टंचाई कृती आराखडा मंजूर करण्यात आलेला असून या कालावधीकरिता 2 हजार 895 उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.यासाठी 37 कोटी 44 लाख 85 हजार रुपयांच्या टंचाई कृती आराखड्याला मंजुरी देण्यात येवून हा कृती आराखडा शासनास सादर करण्यात आला आहे.   

सद्यस्थितीत पाणी टंचाई निवारणार्थ सन 2023-24 मध्ये तात्पूत्या पूरक नळ उपाययोजनांच्या 28 लक्ष 60 हजार रुपयांच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.नळ पाणी पुरवठा योजनेच्या 63 लक्ष 92 हजार रुपयांच्या प्राप्त प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकरणात धाराशिव जिल्हा परिषद यांचेकडून प्राप्त होणाऱ्या टंचाई उपाययोजनांच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

जिल्ह्यात गत वर्षी कमी प्रमाणात झालेले पर्ज्यन्यमान लक्षात घेता, ग्रामीण व शहरी भागातील संभाव्य पाणी टंचाई परिस्थितीत नागरीकांसह जनावरांना तात्काळ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्यामुळे विहिर,विंधनविहिर अधिग्रहण व टँकर मंजूरीबाबतचे अधिकार प्रत्यार्पित करून जिल्हयात विहिर व विंधन विहिर अधिग्रहण मंजूर करण्याचे अधिकार हे सर्व तहसिलदारांना तर टँकर मंजूर करण्याबाबतचे अधिकार हे सर्व उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहेत.त्यानुसार जिल्ह्यात कोणत्याही गाव,वाडी-वस्तीवर पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्यास त्यादृष्टीने क्षेत्रीय स्तरावरुन तातडीने उपाययोजना करून टंचाईग्रस्त गावातील नागरिकांना तात्काळ पाणी पुरवठा करण्यात यावा याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी संबंधित विभाग प्रमुखांना यावेळी दिले.

सद्यस्थितीत जिल्ह्यात धाराशिव, तुळजापूर,उमरगा, लोहारा, भूम, परंडा,वाशी व कळंब तालुक्यातील एकूण 91 गावांत टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.यासाठी 135 खासगी टँकर अधिग्रहित करण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यात 341 गावांमधील 767 विहिरी,विंधन विहिरी पाणी पुरवठ्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.                

जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पाटबंधारे प्रकल्पातील उपलब्ध पाणी साठा हा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे.धाराशिव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या उजनी धरणातील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेवून सध्या शहरात सात ते आठ दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे.धरणातील जिवंत आणि मृत पाणीसाठ्यातून शहराला सप्टेंबर-2024 पर्यंत पाणी पुरवठा केला जावू शकतो.तसेच जिल्ह्यातील सर्व 7 लक्ष 90 हजार 393 पशुधनासाठी सप्टेंबर- 2024 च्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरेल इतका चारा उपलब्ध असल्याबाबत माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने यावेळी दिली.  

जिल्हयातील सर्व पाटबंधारे प्रकल्पातील अनाधिकृत पाणी उपसा होवू नये याकरिता सर्व तहसिलदार अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय महसूल मंडळनिहाय भरारी पथक गठीत करण्यात आले आहे.तालुकास्तरीय भरारी पथकात कार्यालयातील एक नायब तहसीलदार,संबधित महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी,सज्जाचे तलाठी,संबंधित प्रकल्पाचे शाखा अभियंता,महावितरण कंपनीचे संबधित अभियंता,संबंधित कार्यक्षेत्रातील पोलिस उपनिरिक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या भरारी पथकाकडून आतापर्यंत अनाधिकृत पाणी उपसा करणारे 25 विद्युतपंप साहित्य जप्त केले असून प्रकल्प क्षेत्रातील 586 विद्युत कनेक्शन खंडीत करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.  

पाणी टंचाई उपययोजना निवारणार्थ जिल्ह्यात प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी यावेळी दिल्या.तरीही नागरिकांच्या पाणी टंचाईच्या अनुषंगाने टंचाई व नैसर्गिक आपत्ती विषयक काही तक्रारी असल्यास त्याचा निपटारा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‌‘टंचाई नियंत्रण कक्ष' तयार करण्यात आला आहे.नियंत्रण कक्षाचा  02472- 225618/227301 हा संपर्क क्रमांक असून नागरिकांना आपली तक्रार या क्रमांकावर नोंदविता येणार आहे.त्यानुसार या कक्षामार्फत संबंधित विभागाशी समन्वय करून या तक्रारींचा निपटारा करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी सर्व उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना या बैठकीत दिली.

शासन निर्णय दि. 31 ऑक्टोंबर 2023 अन्वये जिल्ह्यातील लोहारा, धाराशिव व वाशी हे 03 तालुके दुष्काळग्रस्त घोषीत करण्यात आले आहेत.शासन निर्णय दि. 10 नोव्हेंबर 2023 व दि.16 फेब्रुवारी 2024 अन्वये उर्वरीत 05 तालुके दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषीत करण्यात आले आहेत.                 

त्यानुसार शासन निर्णय दि.29 फेब्रुवारी 2024 अन्वये,लोहारा, धाराशिव व वाशी या तीन दुष्काळग्रस्त तालुक्यासाठी 208 कोटी 50 लक्ष 76 हजार एवढा निधी  मंजूर करण्यात आला आहे.त्यापैकी आजपर्यंत या तालुक्यातील 01 लक्ष 23 हजार 258 इतक्या शेतकऱ्यांचा डाटा पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे.त्यापैकी  01 लक्ष 03 हजार 630 एवढ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीव्दारे अनुदान जमा करण्यात आले आहे.तसेच उर्वरीत 13 हजार 998 एवढ्या शेतकऱ्यांचे E-KYC करणे प्रलंबीत असल्यामुळे त्यांचे खात्यात अनुदान जमा होवू शकले नाही.तेव्हा संबधीत शेतकऱ्यांनी संबंधीत तहसील कार्यालय,तलाठी कार्यालय व ग्रामपंचायतीमध्ये त्यांचे V.K. नंबर घेवून नजीकच्या CSC सेंटरमध्ये जाऊन  E-KYC  पूर्ण करून घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.

 
Top