धाराशिव (प्रतिनिधी)-24 ते 26 मे दरम्यान धाराशिव जिल्ह्यात अनेक भागामध्ये वादळी वारा व अवकाळी पावसाने घराचे, जणांवाराच्या गोट्याचे, फलबागांचे व  भाजी पाल्याचे अतोनात नुकसान झालेले असून शासनाने तात्काळ पचनामे करून बाधित शेतकरी कुटूंबाना निकषाच्या बाहेर जाऊन मदत करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.

धाराशिव तालुक्यातील सांगवी, कामेगाव, दाऊपूर, भंडारवाडी इ. भागामध्ये दौरा केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी घरावरील दगड पडून मयत झालेले हणमंत अर्जुन कोळपे यांच्या कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केले. त्याच बरोबर हृदय विकाराने मृत्यू पावलेल्या विक्रम पाटील यांच्या कुटुंबालाही भेट दिली. तसेच संपूर्ण घरावरील पत्रे उडून गेलेल्या बाळासाहेब क्षीरसागर यांच्या घराची पाहणी केली. त्याच बरोबर सिंदफळ येथील रवी कापसे यांच्या पडलेल्या केळी बागेची पहाणी केली.

यावेळी बोलताना मधुकरराव चव्हाण म्हणाले कि, खरीप व रब्बी हंगाम दुष्काळी परिस्थिती मुळे वाया गेल्याने शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. त्यातच वादळी वारे व अवकाळी पावसाने झालेले नुकसानही मोठया प्रमाणात आहे. मोठया प्रमाणात नुकसान होऊनही विमा कंपन्यानी अपेक्षित नुकसान भरपाई दिलेली नाही. बँकाचे कर्जाचे पुनरगठन होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पेरणी साठी पैसे नाहीत. त्यामुळे शासनाने निकष बाजूला ठेवून मदत करण्याची गरज आहे. या वादळी वाऱ्याने महावितरण चे पोल मोठया प्रमाणात पडलेले आहेत. त्यामुळे अजूनही विजपुरवठा सुरळीत झाला नसल्याने पाणीपुरवट्या वर परिणाम होत आहे. त्यामुळे महावितरण ने युद्धापातळीवर काम करण्याची गरज आहे. यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेसचे जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, जिल्हा सरचिटणीस अशोक बनसोडे सर,युवा कार्यकर्ते सुभाष हिंगमिरे, अमोल पाटील, अशोक शिंदे, बाबासाहेब जाधव, रवी कापसे यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top