धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव शहरातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व झेंडा ग्रुपच्या वतीने घरपोच मोफत पाणीवाटपाचा उपक्रम युवा सेना शहरप्रमुख रवी वाघमारे यांच्या पुढाकारातून प्रभाग क्र. 16 मध्ये राबविण्यात येत आहे. शिवसेनेच्या दुष्काळ गंभीर आणि शिवसेना खंबीर या धोरणामुळे या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या धोरणानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या प्रेरणेने व शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचे शहरप्रमुख तथा झेंडा ग्रुपचे अध्यक्ष रवी वाघमारे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 16 मध्ये हा उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे.

सध्या धाराशिव शहरात आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. आधीच उन्हाळ्याचे दिवस आणि त्यात पाणी टंचाई यामुळे जनता हैराण झाली आहे. म्हणून मदत नव्हे कर्तव्य या भावनेतून शिवसेना व झेंडा ग्रुप धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने युवासेना शहरप्रमुख रवी वाघमारे यांच्या वतीने प्रभाग 16 मधील गणेश नगर भागातील नागरिकांसाठी स्वखर्चाने घरपोच मोफत पाणी वितरण करण्यात येत आहे. फोन केल्यानंतर तात्काळ 500 लिटर पाण्याचा टँकर संबंधित नागरिकाला तात्काळ घरपोच पाठविण्याची सोय करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे टंचाईच्या काळात नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


 
Top