धाराशिव (प्रतिनिधी)-माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने राज्यात जलयुक्त शिवार योजना राबविली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे उत्पन्न वाढू लागले. मात्र त्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने जिल्हा भकास केला. सिंचनाच्या योजनांना ब्रेक लावून, या योजनांवर खर्च होणारा निधी रोखून महाविकास आघाडी जनताविरोधी भूमिकेची असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता येणार नाही, याची काळजी मतदारांनी घ्यावी, असे आवाहन माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केले.

महायुतीच्या उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील पाटील यांच्या प्रचारार्थ परंडा तालुक्यातील कौडगाव येथे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी प्रचारसभेच्या माध्यमातून ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी उमेदवार अर्चना पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, तुकाराम आघाडे यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना माजी आमदार सुजितसिंह ठाकूर म्हणाले की, धाराशिव जिल्ह्याच्या सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, अशा शेतकरी आणि सामान्यांशी केंद्रीत मोठ्या योजना आणि प्रकल्प राबविले. मात्र विरोधकांनी सतत खोडा घातला. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची योजना असलेली जलयुक्त शिवार योजना बंद केली. अशा शेतकरी विरोधी धोरणे राबविणाऱ्या महाविकास आघाडीला पुन्हा सत्तेवर येवू द्यायचे नसेल तर आताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या अधिकृत उमेदवार अर्चना पाटील यांना घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबवून विजयी करावे, असे आवाहन माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केले.


 
Top