भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील पखरुड येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रा महोत्सवानिमित्त जंगी कुस्त्याचे निकाली मैदान दि. 2 मे मंगळवार रोजी ग्रामस्थांच्या व आश्रयदात्यांच्या वतीने अनेक रणझुंजार व तुफानी लढती मैदानामध्ये संपन्न झाल्या. 

पखरुड मुक्कामी पहिल्यांदाच पोस्टरवरील कुस्त्याचा आनंद गावकरी व पंचक्रोशीतील पैलवान, वस्ताद यांनी घेतला. भव्य दिव्य मैदान घेताना आंतरराष्ट्रीय पैलवान  सुजय तनपुरे यांनी डोळ्याचे पापणी लवते न लवते तो विजय संपादन केला. मैदानात विकास गटकळ, दत्ता मेटे, आकाश भोसले यांनी रणझुंजार कुस्त्या करीत आपल्यासह आपल्या गावाचे आणि जिल्ह्याचे नाव उज्वल केले. भैरवनाथ केसरी किताबासाठी पखरुड गावचा पांडुरंग कावळे आणि सय्यद बीड अशी कुस्ती रंगली. तुफानी व तगडया कुस्तीत पांडुरंग कावळे यांनी हप्ते डावावर विजय संपादन करीत आपल्या गावचे नाव सार्थकी केले. तात्यासाहेब चव्हाण, अप्पासाहेब चव्हाण यांच्या वतीने विजयी पांडुरंग कावळे पैलवानास भैरवनाथ केसरी किताबाची गदा व गावकऱ्यांच्या वतीने रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. अशा पद्धतीने गावचे कुस्ती मैदान गावच्या पैलवानांनी गाजवले. यामध्ये गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. 

गावच्या मैदानात गावातील नवोदित बालमल्ल गुरु हनुमान आखाडा आखाड्याचे व वस्ताद अप्पासाहेब चव्हाण यांच्या शिष्यांनी मैदान गाजवले. गावांमधील उदयोन्मुख पैलवानांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून आप्पासाहेब चव्हाण हे स्वतः आखाड्यामध्ये तन मन धनाने कुस्तीकार्य करीत आहेत. आपल्या गावची मुले बलशाली, बलवान, गुणवान व चरित्र्यवान होण्यासाठी झटणाऱ्या या पखरुडकर ग्रामस्थांच्या वतीने खरोखरच अखीव आणि रेखीव मैदान तयार करण्यात आले होते. मैदानामध्ये राजेंद्र चव्हाण, तात्यासाहेब चव्हाण, अनुरथ चव्हाण, राष्ट्रीय पैलवान अशोक वाघमोडे, बिभिषन वाघमोडे, वसंत रसाळ, बाळू सुबुगडे यांनी न्यायदानाचे कार्य केले. संबंधीत कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी भैरवनाथ मित्र मंडळ व पंचायत समिती सदस्य काकासाहेब चव्हाण यांनी सहकार्य केले. सदरील कुस्ती मैदानाचे धावते समालोचन गोविंद नवनाथ घारगे यांनी करून कुस्ती मैदानात रंगत आणली.


 
Top