धाराशिव (प्रतिनिधी) -वडील साखर कारखान्यात सुरक्षारक्षक, आई शेतमजुरीचे काम करून मुलांच्या शिक्षणासाठी करीत असलेले प्रयत्न आणि त्याची जाणीव ठेवून प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत रोशनी बालाजी धनेराव हिने दहावीच्या परिक्षेत 91 टक्के गुण मिळवून कुटुंबाचा आणि शाळेचा नावलौकिक वाढविला आहे. तिच्या जिद्द व चिकाटीने तिला हे सुयश मिळवून दिल्याने गुरूजनांनीही तिच्या घरी जावून तिचे कौतूक केले आहे.

उमरगा तालुक्यातील कोंडजीगड येथून समुद्राळ येथील जयस्वामी नारायण विद्यालयात शिक्षणासाठी रोशनी बालाजी धनेराव ही ये-जा करून शिक्षण घेत होती. तिच्या घरची परिस्थितीत बेताचीच आहे. वडील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्यात सुरक्षारक्षक म्हणून कामाला आहेत. आई ज्योती धनेराव या शेतमजुरीचे काम करून मिळेल त्या रोजगारातून कुटुंबाची उपजीविका भागविणे आणि मुलींच्या शिक्षणात तडजोड नको म्हणून शिक्षणासाठी हवे ते प्रयत्न आई-वडिलांनी केले. या प्रयत्नांची रोशनीने जाणीव ठेवत जिद्दीने दहावीत अभ्यास केला. घरखर्च भागत नसला तरी  या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शिक्षण हे एकमेव माध्यम आहे. हे जाणून रोशनीने मोठ्या जिद्दीने अभ्यास केला व दहावीच्या परिक्षेत 500 पैकी 458 गुण मिळविले. दहावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या धनेराव कुटुंबीयांना तिच्या महागड्या शिक्षणाची चिंता आहे. तरीही काहीतरी करू, परंतु मुलीला डॉक्टर व्हायचे आहे, त्यासाठी हवे ते कष्ट करायला आपण तयार असल्याची प्रतिक्रिया रोशनीच्या आई-वडिलांनी दिली. दरम्यान रोशनीने दहावीच्या परिक्षेत सुयश मिळविल्याबद्दल तिचा मुख्याध्यापक कोकाटे, शिक्षक सहदेव कांबळे, व्ही. के. धनेराव, एस. व्ही. सुरवसे, चव्हाण व राठोड यांनी घरी जावून तिचा सत्कार केला.

 
Top