उमरगा (प्रतिनिधी)-विधानसभा मतदार संघात मंगळवारी दि.7 मे रोजी सकाळ पासूनच मतदान होणार आहे. मतदान जास्तीत जास्त आणि शांततेत व्हावे यासाठी निवडणूक विभाग व पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. सोमवारी (06) सकाळी नियूक्ती दिलेल्या केंद्रावर जाण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांची धावपळ सुरू होती. 

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उमरगा विधानसभा मतदारसंघातील तीन लाख दहा हजार दोन मतदार संख्या आहे. यात पुरूष एक लाख 64 हजार 160, महीला एक लाख 45 हजार 832, 85 वर्षाच्या पुढील वयस्क व दिव्यांग 964 व दहा तृतीयपंथी मतदार आहेत. मतदारसंघात 315 केंद्र असून उमरगा तालुका 229 तर लोहारा तालुका 94 मतदान केंद्र आहेत. मतदारसंघातील एकूण 315 मतदान केंद्रावर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर निवडणूक विभागाने महिला मतदान केंद्र,आदर्श मतदान केंद्र निर्माण करून सर्व इव्हीएम मशीन सोबत व्हिव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे. विधानसभा मतदार संघात दोन महिला व्यवस्थापित मतदान केंद्र निर्माण करण्यात आलेले आहे. या दोन केंद्राची जबाबदारी महिला अधिकारी व कर्मचारी सांभाळणार आहेत. लैंगिक समानता व मतदान प्रक्रियेत महिलांच्या रचनात्मक सहभागाचे संबंधातील वचन बद्धतेचा भाग म्हणून लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी स्वतंत्र चालविलेले दोन मतदान केंद्र असून, यास सखी मतदान केंद्र हे नाव देण्यात आले आहे. सखी मतदान केंद्र अन्‌‍ आदर्श मतदान केंद्र अधिक आकर्षक व सुंदर होण्यासाठी निवडणूक विभागाने प्रयत्न केले आहेत.


 
Top