तुळजापूर (प्रतिनिधी)-तालुक्यातील एका खाजगी कंपनीकडून अनधिकृतपणे शेत रस्त्याची मागणी करून दमदाठी केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यामधुन केला जात आहे. याला महसुल खात्याची साथ मिळत असल्याने याची सखोल चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना समाधान ॲपच्या माध्यमातून केली आहे.

तुळजापूर तालुक्यात पवनचक्की कंपन्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असून तिर्थ खुर्द येथे चक्क वनखात्याच्या जमीनीतून रस्ता नेण्याचा प्रकार घडला. मात्र या बाबतीत कुठलीही कारवाई झाली नसल्याचे दिसून येते. आधीच शेतकरी दुष्काळ संकटाशी दोन हात करीत असताना हे दुसरे संकट समोर आल्याने आम्ही जगावे का नाही असा सवाल शेतकरी शासनाला विचारत आहे. तुळजापूर तालुक्यातील बारूळ येथील गट नंबर 91 मधून जाणारा शेत रस्ता शेतकऱ्यांना येण्या-जाण्यासाठी चालू असून याची कोणत्याही शेतकऱ्यांना अडचण नाही. तरीही एका नामवंत पवनचक्की कंपनीने महसूलमधील मंडळींना हाताशी धरून शेतकऱ्यांना नोटीस दिली आहे. भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 188 नुसार कार्यवाही करणार असल्याचे कळवले आहे. सदरील कंपनी व्यवसायिक कामासाठी शेतरस्ताची मागणी करून शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचा प्रयत्न कंपनी करत असल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून  जमिनीवर कंपनीकडून होणारे अतिक्रमण होऊ देऊ नये आणि कोणत्याही शेतकऱ्यांची तक्रार नसताना ज्या अधिकऱ्यांनी नोटीस काढली आहे त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 
Top