प्रतिनिधी | धाराशिव 

मोक्का कायद्यांतर्गत तडीपार असलेल्या तीन दरोडेखोरांना शस्त्रासह ताब्यात घेतले आहे. धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली. मात्र या कारवाईत दोघेजण फरार होण्यात यशस्वी झाले.

पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील मोक्का टोळीचा प्रमुख विनोद शिवाजी जामदरे (वय 35) हा त्याच्या इतर 4 साथीदारांसह येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार   स्थानिक गुन्हे शाखेचे पथक येरमाळा परीसरात गस्तीसाठी रवाना झाले. गस्त करत असताना मंगळवारी धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर चोराखळी शिवारात कामत हॉटेलजवळ 5 संशयीत दिसून आले. पोलीस पथकाची चाहुल लागताच ते अंधाराचा फायदा घेऊन पळून जाऊ लागले. त्यांचा पाठलाग करुन तिघांना ताब्यात घेतले. घटनास्थळी पाहणी केली असता तेथे एका गावठी पिस्टलचे मॅगझीन आढळून आले. तर तिघांच्या हातामध्ये कत्ती व कटावणी दिसून आल्याने ते सशस्त्र दरोडा टाकण्यासाठी आलेले असल्याचा पथकाला संशय आला. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांची नावे विनोद शिवाजी जामदारे  (वय 35, सिंहगड रोड, वडगाव बुद्रुक पुणे, मूळ गाव लोणारवाडी, ता परंडा, जि. धाराशिव), बाबासाहेब व्यंकट भायगुडे (वय 25, साईनगर, कोराड वस्ती, हिंगणीपूर, पुणे, मूळ गाव वाटेफळ, ता परंडा, जि. धाराशिव), गणेश दिलीप मस्कर (वय 25, रा. स्वारगेट, पुणे) तर पळून गेलेले दोघे आकाश सुभाष गाडे (वय 27, रा. सिंहगड रोड, पुणे), समाधान आगलावे (वय 25, रा. माणकेश्वर, जि. धाराशिव) अशी सांगितली. 

सदरील संशयितांची माहिती घेतली असता विनोद जामदारे याच्याविरुध्द सिंहगड पोलीस ठाण्यात मोक्का, दरोडा, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, आर्म ॲक्ट, जबरी चोरी, धमकी देणे असे 12 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यास पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड आयुक्तालयाने पुणे जिल्ह्यातून 2 वर्षाकरीता हद्दपार केलेले आहे. गणेश म्हसकर व आकाश गाडे यांच्यावर दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी असे 6 गुन्हे पुणे येथे दाखल आहेत. पळुन गेलेल्या आकाश गाडे याच्या हातामध्ये गावठी पिस्टल होते. पिस्टल हाताळत असताना मॅगझीन घटनास्थळी पडली आणि तो पिस्टल घेऊन पळून गेला. त्याला बार्शी पोलिसांनी मॅगझीन नसलेल्या पिस्टलसह पकडले आहे. ताब्यात घेतलेल्या तिघांना येरमाळा पोलिसांच्या ताब्यात दिले असून पळालेल्या दोघांसह पाच जणांवर येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, चालक सुभाष चौरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 


 
Top