धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हयात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, दुष्काळ सदृश्य मंडळांना दुष्काळी मदत फक्त पंचनामे व घोषणा न करता शेतकऱ्यांच्या खात्यावर पेरणीपुर्व जमा करावी, फक्त घोषणा करून शेतकऱ्याची फसवणूक करू नये असे मत आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केले आहे. मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिव डॉ.सोनीया सेठी यांची भेट घेऊन जिल्ह्यात झालेल्या परिस्थितीची माहिती आमदार पाटील यांनी दिली.

धाराशिव जिल्हयात मागील चार दिवसापासुन अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे शेतीपिकांचे, फळबागांचे, जनावरांचा मृत्यू, राहती घरे, जनावरांचे गोठे, कुक्कुटपालन शेड यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई मिळणे आवश्यक आहे. सध्या पेरणीचे दिवस जवळ आल्यामुळे शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी बि-बियाणे, खते आणण्यास पैसे उपलब्ध नाहीत. फक्त पंचनामे, घोषणा न करता पेरणीपुर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणे गरजेचे आहे. धाराशिव जिल्हयात 11 एप्रिलनंतर 20 एप्रिल रोजी अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे व फळबागांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते. 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या फळ पिकांना सोडुन जिरायत पिका खालील 402 बाधित शेतकऱ्यांच्या 141 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी रक्कम रु. 13 हजार 600 प्रमाणे 19 लाख रुपये मिळणे आवश्यक आहे. 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या फळ पिके सोडुन बागायत पिका खालील 209 बाधित शेतकऱ्यांच्या 73.50 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी रक्कम रु. 27 हजार प्रमाणे रु.19 लाख , 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या फळ पिका खालील 2031 बाधित शेतकऱ्यांच्या 1220.60 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी रक्कम. 36 हजार प्रमाणे रक्कम रु.439 लाख असे एकूण 2642 शेतकऱ्यांना रक्कम 478 लाख रुपये मदतीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडुन आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सादर झाला आहे. हा प्रस्ताव तात्काळ मागवुन शेतकऱ्यांना पेरणीपुर्वी नुकसान भरपाई मिळणे आवश्यक असताना अजूनही प्रस्ताव प्रलंबित आहे. 


 
Top