उमरगा (प्रतिनिधी)- तालुका कृषी विभागात मंजूर 50 पदापैकी 14 पदं रिक्त आहेत. त्यामुळे कृषी सहाय्यकांवर अतिरिक्त कारभार सुरू आहे. तर पंचायत समितीत विशेष घटक योजना व सामान्य हि दोन महत्त्वाचे कृषी अधिकारी पदे रिक्त आहेत. त्यामुळे येथील विस्तार अधिकारी अतिरिक्त कामांचे ओझे वाहत असल्याने तारेवरची कसरत करावी लागत आहे.

उमरगा तालुक्यात हा कोरडवाहू शेती क्षेत्र मोठे आहे. पावसाची वार्षिक सरासरी 799 मिमी असून 96 गावातील एकूण 99 हजार 737.93 हेक्टर इतके भौगोलिक क्षेत्र आहे. शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या योजनांची माहिती देण्याचे काम कृषी विभागाच्या माध्यमातून होते. तालुका कृषी अधिकारी कार्यालयात 22 मे 2009 च्या सुधारित आकृतीबंधानुसार तालुका कृषी अधिकारी यांच्यासह 50 मंजूर पदे आहेत. बळीराजाच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या कृषी विभागाला रिक्त पदांचे गृहण लागले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून यातील 14 पदे रिक्त आहेत. राज्य सरकारने कृषी विभागातील हजारो रिक्त पदे भरली नसल्याने शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यात 22 कृषी 'सहाय्यकांना तालुक्यातील 96 सांभाळणे कठीण होत आहे. एका कृषी सहाय्यकाकडे 3 ते 4 गावांचा अतिरिक्त कारभार असल्याने शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पाहोचवणे शक्य नाही. तालुका कृषी विभागात कृषी सहाय्यक 3 पदे, लिपिक 02 पद, अनुरेखक 4 पदे, शिपाई 5 यांसह 14 रिक्त पदांचा समावेश आहे. तालुका कृषी विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे त्यांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन, फळबाग लावगड केली जाते. तालुक्यात शेती हे एकमेव उत्पन्नाचे साधन आहे. मात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने शासनाच्या विविध योजना तसेच कृषी विभागाकडून वेळोवेळी शेतीविषयक मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी कृषी विभागापासून दुरावले गेल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. रिक्त पदांमुळे योजना अंमलबजावणीची गती मंदावली आहे. त्यामुळे रिक्त व नवीन पदसंख्या वाढीसह भरती करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.


 
Top