धाराशिव (प्रतिनिधी) - खरीप हंगाम 2023 मध्ये सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानी पोटी जिल्ह्यातील 1 लाख 92 हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रारी दाखल केल्या होत्या, यातील पंचनामे झालेल्या 25 मंडळातील 37 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 39 कोटी रुपये वितरित करण्यात आले असून पंचनामे न झालेल्या उर्वरित 32 मंडळातील शेतकऱ्यांबाबत नुकसानीची रक्कम ठरविण्याची कार्यप्रणाली अन्यायकारक असून ती बदलण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

विमा कंपनीकडे प्राप्त 1 लाख 92 हजार नुकसानीच्या पूर्वसूचनेतील 25 महसूल मंडळातील शेतकाऱ्यांच्याच नुकसानीचे पंचनामे विमा कंपनीकडून करण्यात आले होते. उर्वरित 32 महसूल मंडळात विमा कंपनीने पंचनामे केलेले नाहीत. या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र नुकसान भरपाईची रक्कम ठरवत असताना विमा कंपनी कडून अवलंबली जात असलेली कार्यप्रणाली शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याने यामध्ये दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली  आहे.

या हंगामात पावसातील खंडामुळे झालेल्या नुकसानीपोटी 25 % अग्रिम प्रमाणे यापूर्वीच शेतकऱ्यांना रु. 252 कोटी वितरित करण्यात आले आहेत. तर ऑनलाईन तक्रार दिलेल्या जिल्ह्यातील 1 लाख 92 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अधिकचे 100 कोटी रुपये जमा होणे अपेक्षित आहे. मात्र विमा कंपनीकडून पंचनामे न केलेल्या 32 महसूल मंडळा बाबत त्याप्रमाणे कार्यवाही होत नसल्याने कार्यप्रणालीत दुरुस्ती करण्याचे सूचित करण्यात आले आहे. या बाबत पाठपुरावा सुरू असून लवकर पैसे मिळावे या साठी प्रयत्न आहेत.

 
Top