धाराशिव (प्रतिनिधी)- उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिव्यांग आणि 85 वर्षांवरील वयस्क मतदारांचे त्यांच्या घरी जाऊन पोस्टल मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान घेण्यात आले.

भारत निवडणूक आयोगाने प्रथमच दिव्यांग आणि 85 वर्षावरील वयस्क नागरिकांचे मतदान त्यांच्या घरी जाऊन पोस्टल मतपत्रिकेच्या माध्यमातून करून घेतले.त्यामुळे या दिव्यांग व वयस्क मतदारांना दिलासा मिळाला.

ज्या दिव्यांग आणि 85 वर्षावरील वयस्क व्यक्तींना घरीच पोस्टल मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान करावयाचे होते,अशा 4432 व्यक्तींनी नमुना 12 ड निवडणूक विभागाकडे भरून दिला होता.2 मे ते 5 मे 2024 दरम्यान घरी जाऊन पोस्टल मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान घेण्याची मोहीम राबविली.यादरम्यान 4432 व्यक्तींपैकी 3998 व्यक्तींनी घरीच पोस्टल मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान केले.यामध्ये 85 वर्षावरील वयस्क असलेल्या 3192 व्यक्तींनी आणि 787 दिव्यांग व्यक्तीने मतदान केले.तसेच अत्यावश्यक सेवेतील 19 व्यक्तीनी देखील याच मोहिमेदरम्यान मतदान केले.पोस्टल मतपत्रिकेच्या माध्यमातून घरीच मतदान करून घेण्यात तिसऱ्या टप्प्यात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ राज्यात अव्वल ठरला आहे.


 
Top