उमरगा (प्रतिनिधी)-तालुक्यातील मुळज येथील हजरत मियासाहेब औलिया तामीर दर्गा उरूस मंगळवार, (दि 09) गुढी पाडव्यापासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तालुक्यातील मुळज येथे हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक म्हणून हजरत मियासाहेब औलीया तामीर ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी हजरत मिय्यासाहेब औलिया तामीर यांचा उरूस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यात सर्व जाती धर्मातील भाविकाचा मोठा सहभाग असतो. प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी उरूसानिमित्त मंगळवार, (दि 09) रोजी सायं सात वाजता विविध सुगंधित फुलांनी सजवलेल्या संदल शरिफ (मिरवणुक) काढण्यात येणार आहे. दर्ग्याचे पुजारी मिय्यालाल काझी यांच्या निवास स्थानापासून गावातील प्रमुख मार्गावरून ढोल, ताशा, बॅन्ड या पारंपरिक वाद्यांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत संदल मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री दहा वाजता गावातील मानाच्या हिंदू समाज बांधवांच्या हस्ते दर्ग्यावर चादर चढविण्यात येणार आहे. बुधवारी, (दि 10) रोजी सकाळ पासून दिवसभर नवस पूर्ती व दर्शन, सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तर सायंकाळी तेलाच्या 1100 दिव्यांचा चिराका (दिपप्रज्वलन) करण्यात येणार आहे. रात्री आठ वाजता परंपरेने सुरू असलेल्या नामवंवत निमंत्रित भारूडकारांचा समाज प्रबोधनात्मक भारूडाचा कार्यक्रम होणार आहे. परिसरातील भाविकांनी उरूस महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन उरूस समितीचे अध्यक्ष नवाब सय्यद, अकलाख काजी, मियालाल काजी, बशीर शेख, जिलानी शेख, सलिम मासूलदार, जाफर काझी, वलिपाशा वाडीकर, शंकर बिराजदार, दत्ता उपासे, सयाजी आलगुडे, विश्वास बिराजदार, दिनकर चव्हाण, शिवाजी सोयराप्पा, सुदर्शन चव्हाण, बालाजी चव्हाण, व्यंकट दंडगुले, राजेंद्र कलशेट्टी आदींसह ग्रामस्थानी केले आहे.


 
Top