धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव लोकसभा मतदारसंघातून आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्याकडून राज्याचे माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या सुनबाई व भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांची उमेदवारी घोषित झाली आहे. 2004 साली डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात पवनराजे निंबाळकर यांनी धाराशिव विधानसभा निवडणूक लढविली होती. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने तर विद्यमान खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी शिवसेनेच्यावतीने निवडणूक लढवली होती. परत एकदा 2024 च्या निवडणुकीमध्ये दोन्ही घराणे आमनेसामने आले आहेत.

धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी गेल्या पंधरा दिवसापासून ही जागा कमळ, घड्याळ की धनुष्यबाण यापैकी कोण लढणार याबाबत चर्चा चालू होती. आज अखेर माजी जि. प. उपाध्यक्ष तथा उस्मानाबाद लेडीज क्लबच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मुंबईत अधिकृत जाहीर केली. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, शिवसेना शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


धाराशिवमध्ये जल्लोष

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप व राष्ट्रवादी केॉंग्रेस अजित पवार गट यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत मोठा जल्लोष केला. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सचिन तावडे यांनी अर्चना पाटील या आतापर्यंत केलेल्या कामावर निवडून येतील असे सांगितले. तर भाजपा महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई पुनगुंडे यांनी धाराशिव हा आई तुळजाभवानीची जिल्हा आहे. एका महिलेला न्याय मिळला असून, लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देवून महिलांचा सन्मान केला आहे. या निवडणुकीत अर्चना पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून येथील असे सांगितले.


 
Top