धाराशिव (प्रतिनिधी)-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली देशात व राज्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. आणखी अनेक विकासकामे करण्यासाठी विकासकामांचा ओघ कायम ठेवणार असल्याची ग्वाही महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांनी वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील मारूती मंदिरात शनिवारी सायंकाळी आरती करून दर्शन घेतले. यावेळी आयोजित प्रचारसभेस शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुरेश कवडे, नवनाथ नाईकवाडी, नवनाथ जगताप, सूर्यकांत सांडसे, राजगुरू कुकडे, सत्यवान गपाट यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दत्ता साळुंके म्हणाले की, राज्यात आपल्या हक्काचे सरकार स्थापन झाले. यामुळे धाराशिव जिल्ह्यातील विकासकामांना भरभरून निधी मिळत आहे. विकासकामांतून जिल्ह्याचा सर्वागीण विकास साधण्यासाठी महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना विजयी करणे गरजेचे आहे. मतदारांनी महायुतीचे चिन्ह असलेल्या घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून अर्चनाताईंना आपले अमूल्य मत द्यावे, असे आवाहन केले. यावेळी महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top