भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील वालवड येथे टँकर द्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल पुरवठा मुबलक होत नसल्याने 10 फेऱ्या मंजूर असून, देखील केवळ 3 किंवा चार फेऱ्या दिवसभरात होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. तालुक्यातील वालवड येथे डिझेल अभावी टँकर बंद राहत असल्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रशासनाने याची तातडीने दखल घेवून त्वरीत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामपंचायत सरपंच यांच्या सह सदस्य व नागरिक करत आहे. 

टँकरचे गाव म्हणून धाराशिव जिल्ह्यात वालवडची ओळख आहे. जिल्ह्यात सगळ्यात आधी वालवडला टँकर लागतात. या वर्षी दुष्काळी परिस्थिती मध्ये प्रशासनाने चार टँकर मंजूर केले होते. 25 किलोमिटर अंतरावरून जांब मात्रेवाडी साठवण तलावाजवळील विहिरीतून टँकरद्वारे पाणी आणले जाते. 12 हजार लिटर क्षमतेच्या 2 टँकरच्या प्रत्येकी 3 खेपा व 24 हजार लिटर क्षमतेच्या 2 टँकरच्या 2 खेपा अशा एकूण प्रतिदिन 10 खेपा मंजूर आहेत.परंतु गेल्या काही दिवसांपासून कधी डिझेल नसल्यामुळे तसेच कधी टायर फुटणे यासारख्या तांत्रिक अडचणींमुळे गावाला कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. डिझेल अभावी कधी 3 खेपा, कधी 6 खेपा तर कधी टँकर बंद राहत असल्यामुळे गावात तीव्र पाणटंचाई निर्माण झाली आहे. गावाला चार टँकर मंजूर असताना सुद्धा केवळ ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.


10 ते 15 दिवसातून एकदा लोकांना पाणी मिळत आहे.  याबाबत वारंवार ठेकेदाराला कळवून सुद्धा दखल घेतली जात नाही.त्यामुळे सदरील पाणीपुरवठा करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून प्रशासनाने पाणीपुरवठा सुरळीत करून द्यावा.

कृष्णा मोहिते (उपसरपंच वालवड)


रोजच्या 10 खेपा मंजूर असताना निम्म्या खेपा पण होत नाहीत. त्यामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याबाबत वरिष्ठांना लेखी कळविले आहे.

मुकुंद लवटे, ग्रामविकास अधिकारी वालवड


 
Top