धाराशिव (प्रतिनिधी) धाराशिव जिल्ह्यातील आश्रम शाळेत कर्तव्य बजावणारे शिक्षक आणि शिक्षकेतर-कर्मचारी नियमित वेतनापासून वंचित आहेत.तसेच गेल्या वर्षभरापासून 40 कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी प्रस्ताव मंजूर असूनही रक्कम मिळालेले नाही. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी तात्काळ प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आश्रम शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

धाराशिव येथील जिल्हाधिकाऱ्यांना आश्रम शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सतीश शहाजी कुंभार यांनी आज (दि.18) निवेदन दिलेले आहे. या निवेदनामध्ये नमूद केले आहे की, आश्रम शाळेमध्ये काम करणारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे वाडी,वस्ती, तांडा डोंगर आणि दुर्गम भागात शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवण्याचे काम करत आहेत, या शिक्षकांना दरमहा एक तारखेला वेतन मिळावे या संदर्भात समाज कल्याण विभागाकडे यापूर्वी चर्चा झालेली आहे. मात्र प्रत्यक्षात दरमहा एक तारखेला वेतन देण्याची अंमलबजावणी झालेली नाही. आश्रम शाळा कार्यरत 40 शिक्षक व कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे प्रस्ताव समाज कल्याण विभाग यांचे धाराशिव येथील कार्यालयात प्रलंबित आहेत. अनेक कर्मचारी सेवा निवृत्त झालेले आहेत. मात्र त्यांना भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळत नाही. मुला मुलींचे लग्न घर बांधणी,आरोग्य,घर दुरुस्ती याकरिता या रकमेची कर्मचाऱ्यांना अत्यंत आवश्यकता आहे. त्यांच्या कष्टाची हक्काचे पैसे मिळत नाहीत ही खंत आहे. सदर आश्रम शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दरमहा वेतन देण्यात यावे आणि भविष्य निर्वाह निधीचा प्रश्न तात्काळ सोडवावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जिल्हाधिकारी धाराशिव यांच्यामार्फत निवेदन देऊन आपली व्यथा मांडलेली आहे.

 

 
Top