तेर (प्रतिनिधी)- पुढील महिन्यात होत असलेल्या वारकरी सांप्रदयातील थोर संत संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या वार्षीक समाधी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविक भक्तांसह वारकऱ्यांना आचारसंहितेचे पालन करुन चांगल्या पद्धतीने  सुविधा उपलब्ध द्या. जे अधिकारी व कर्मचारी कामात कुचराई करतील अशांवर कार्यवाही करण्यात येईल अशी तंबी तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी दिली.

मंगळवार दि.16 एप्रिल रोजी संत गोरोबाकाका समाधी सोहळ्यानिमित्त गोरोबाकाका मंदिरात विविध विभागाने करावयाच्या उपाययोजना संदर्भात नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ.जाधव बोलत होत्या. यावेळी कळंबचे उपविभागीय अधिकारी संजय पवार, आपत्ती व्यवस्थापनच्या वृषाली तेलोरे, एसटी महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिक्षक  मुकेश कोमटवार, मंदिर समितीच्या प्रशासक तथा सहाय्यक धर्मादाय आयुक्त रूपाली कोरे, सपोनि संतोष तिगोटे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक होळे, ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब खोचरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी तहसीलदार डॉ.जाधव यांनी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे तंतोतंत पालन करून भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावी. भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास कुचराई करणाऱ्या संबंधित आधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात येईल. असे सांगून यात्रेमध्ये कुठल्याही प्रकारचे राजकीय बँनरबाजी चालणार नसल्याचे नमूद केले. सर्व विभागप्रमुख व नागरिकांनी आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी व यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी महावितरण, पोलीस, ग्रामपंचायत, पंचायत समिती, आरोग्य, बांधकाम, पाटबंधारे, एस.टी.महामंडळ, आपत्ती व्यवस्थापन, यांनी केलेल्या  उपाययोजना सविस्तर आराखडा पुढील बैठकीत सादर करण्याची सुचना तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी केली.

अवैध धंदा चालणार नाही. श्री संत गोरोबाकाकाची यात्रा ही संताची यात्रा आहे. या यात्रेत कुठलाही अवैध धंदा, दारू, सुरड जुगार चालू देणार नाही अशी ग्वाही कळंबचे उपविभागीय आधिकारी संजय पवार यांनी दिली. शिवाय सांयकाळी 10 वाजेपर्यंतच स्पिकर वाजविण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे पवार यांनी सांगितले.

यावेळी सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड, मंडळ निरीक्षक एन.डी.नागटिळक, दिपक नाईकनवरे तलाठी प्रशांत देवमुख, पोलिस पाटील फातेमा मनियार, डॉ.संगमेश्वर  धोंगडे, डॉ. शाम पाटील, ए. एस. स्वामीं, पोलिस उपनिरीक्षक इकबाल सय्यद, मंदिर समितीचे व्यवस्थापक साहेबराव सौदागर, बीट अमंलदार प्रदीप मुरळीकर व  नागरिक उपस्थित होते.


 
Top