कळंब (प्रतिनिधी)-येथील बस आगारात अनेक समस्याने डोक वर काढल्याने व प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये खटके उडत आहेत. बस असून अडचण आणि सामान नसून खोळंबा अशी गत कळंब आगारात सध्या झाली आहे. कळंब च्या आगारात जवळपास 80 च्या वर बस गाड्या आहेत. यात अनेक बस केवळ सामान नसल्यामुळे दुरुस्ती अभावी डेपोतच पडून आहेत. कर्मचाऱ्यांची वाढती संख्या, त्यात बसची संख्या अपुरी यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होत नाही. यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यात मोठे खटके दररोज उडत आहेत. याकडे ना प्रशासन लक्ष देत आहे, ना आगारप्रमुख.

कळंब आगाराला कायमस्वरूपी आगारप्रमुख द्यावा. अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने केल्यामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.  कळंब आगाराला अनेक वर्षापासून कायमस्वरूपी आगारप्रमुख नसल्यामुळे बसची दयनीय अवस्था झाली आहे. याकडे प्रशासनाला लक्ष देणे इतका वेळही उपलब्ध नसल्यामुळे बसची अवस्था अगदी खुळखुळ्यासारखे झाले आहे. त्यामुळे जनसंघ एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीने कायमस्वरूपी आगारप्रमुख द्यावा, अशी मागणी विभाग नियंत्रक यांच्याकडे एका पत्राद्वारे केल्यामुळे राप प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

राप प्रशासनामध्ये जर नियमीत रोजगार मिळाला तरच पगार मिळतो. अन्यथा रजा देऊन घरी बसवावे लागते. अशी अवस्था एसटीच्या प्रशासनात आहे.  कळंब आगारात अनेक बस गाड्या या नादुरुस्त असल्यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होत नाही. तर काहींना डबल ड्युटी दिली जाते. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना रोजगार उपलब्ध होत नाही अशातून तीव्र नाराजी प्रशासनाविरुद्ध व्यक्त केली जात आहे. सर्वांना समान रोजगार द्यावा व रोटेशन पद्धतीने सर्व कर्मचाऱ्यांना समान दिवट्या द्याव्यात अशी मागणी ही एसटीच्या एका संघटनेने केली आहे.

सध्या उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाल्याने व शाळा कॉलेज सुट्टी लागल्यामुळे प्रवाशांची बस स्थानकावर संख्या दिवसेने दिवस वाढत आहे. त्याचबरोबर लग्नसराई, विविध कार्यक्रम उत्सव, सण, यात्रा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यामुळे प्रवाशांची संख्या बस स्थानकावर दिवसेंदिवस वाढत आहे. यातच कळंब आगाराच्या बसची संख्या मात्र घटत चाललेली आहे. अनेक बस नादुरुस्त असल्यामुळे त्या धावू शकत नाहीत. अशातच दुरुस्तीसाठी जिल्हा कार्यालयाकडून सामान पुरवठा कमी प्रमाणात होत असल्यामुळे अनेक बसेस जाग्यावरतीच उभ्या आहेत. वरिष्ठ कार्यालयाने याकडे लक्ष देऊन उभा असलेल्या बस तातडीने दुरुस्त कराव्यात अशी मागणी प्रवाशातून जोर धरत आहे.


 
Top