तुळजापूर (प्रतिनिधी)- पूर्वी उन्हाळ्याच्या सुटीत मुले  मामाचा गावातील शेतशिवारात व मैदानांमध्ये विविध खेळ खेळत होती. आता मैदानी खेळ खेळणे बंद झाले असून, बंदिस्त खोल्यांमध्ये प्रशिक्षणांमध्ये मुलांना प्रवेश देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उन्हाळी खेळ नामशेष होण्याचा मार्गावर असून यातूनच नवीन व्यवसाय उभा झाला आहे. उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे उदंड झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे मुलांचे बालपण व मनसोक्त खेळणे बांगडणे हिरावुन गेले आहे. हे मुलांच्या उज्वल भविष्यासाठी धोकादायक बनले आहे. पण करावे काय कारण स्पर्धा प्रचंड निर्माण झाली आहे. उन्हाळी शिबीर माध्यमातुन कोट्यावधींची उलाढाल होत आहे.

उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये पूर्वी मुले व तरुण विविध खेळ खेळत होते. आता मात्र प्रशिक्षण शिबिरांमध्ये मुलांना पाठविण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक शहरात अनेक प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. यामुळे मुले मैदानी खेळापासून वंचित राहत असून, बंदिस्त खेळ खेळावे लागते. खेळ खेळण्याकडे मुलांचा मोठा ओढा वाढला आहे. मैदानी खेळ नामशेष होण्याचा मार्गावर आहेत. यासोबतच अनेक मुले प्रशिक्षणांमध्ये सहभागी न होता केवळ मोबाइलमध्ये गुंग असतात. घराघरात अँड्रॉइड मोबाइल आल्यापासून अगदी पाच वर्षांच्या मुलांपासून तर 12 वी पर्यंतच्या मुलांच्या हातात मोबाइल दिसू लागला आहे. त्यात वेगवेगळे गेम्स, रील्स, वेबसिरीज पाहण्यातच मुले आपला वेळ वाया घालवत आहेत. यामुळे मैदानी खेळांकडे मात्र मुलांचे दुर्लक्ष होत चालले आहे. हे मुलांच्या शारीरिक स्वाथ्यासाठी धोकादायक आहे. 

मुलांच्या सर्वांगीण विकासात खेळाचे महत्त्व असून, विद्यार्थ्यांची शारीरिक वाढच नाही तर नेतृत्व, निर्णय क्षमता, चातुर्य, सांघिक वृत्तीतही वाढ होण्यास मदत होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मुले मैदानी खेळाऐवजी मोबाइलच्या जाळ्यात अडकत असल्याची स्थिती आहे. सध्या विटी-दांडू या ग्रामीण भागातील खेळांची क्रेझ लोप पावत चालल्याचे दिसून येत आहे. नवनवीन, बौद्धिक आजकाल बैठ्या खेळांची आणि मैदानी खेळांची जागा व्हिडीओ गेम, मोबाइल व टीव्ही यासारख्या वस्तूंनी घेतली आहे. प्रत्येक वयोगटातील मुलांचा मैदानी खेळ खेळण्यापेक्षा मोबाइल, टीव्ही बघण्याकडे ओढा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. टीव्ही आणि मोबाइल अति बघण्यामुळे अनेक दुष्परिणाम मुलांमध्ये जाणवू लागले आहेत. त्यामुळे मैदानी खेळाकडेही मुलांना वळविण्याची गरज आहे. मैदानी खेळ खेळण्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये संपूर्ण शरीराची हालचाल होते. मैदानी खेळ खेळण्याने शरीर स्वास्थ राहते. शरीराचा व्यायाम, शरीर तंदुरुस्त राहते, त्यामुळे बालपणी व तरुण वयात मैदानी खेळ खेळण्याला प्राधान्य द्यावे.


 
Top