धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सर्वात मोठी नागरी बँक असलेल्या येथील उस्मानाबाद जनता सहकारी बँकेने सलग दुसऱ्ा वर्षीही एनपीए शून्य टक्के ठेवण्यात व 38 कोटी 44 लाख रूपयांचा नफा कमवण्यात यश मिळवले आहे. बँकेने 3029 कोटी 24 लाख रूपयांचा बँकिंग व्यवसायाचा टप्पाही पूर्ण केला आहे.

सध्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात आर्थिक अस्थिरता, औद्योगिक क्षेत्रात मंदी असताना, तसेच गुंतवणुकीवरील व्याजदरामध्ये सातत्याने घट होत असतानाही बँकेने आर्थिक प्रगतीमध्ये सातत्य ठेवल्याचे दिसून येत आहे. 31 मार्च अखेर बँकेचा निव्वळ एनपीए शून्य टक्के केला आहे. या संदर्भात बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनूसार बँकेचे भाग भांडवल 75 कोटी 40 लाख रूपये असून, यातील ठेवी 1853 कोटी 97 लाख रूपयांच्या आहेत. तसेच कर्ज वितरण 1175 कोटी 27 लाख रूपये असून, एकूण व्यवसाय 3029 कोटी 24 लाखांवर गेला आहे.

यामध्ये बँकेने 113 कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे बँकेने यावर्षी सभासदांना आठ टक्के लाभांश दिलेला आहे. तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी आरोग्य विमाही काढला असून, यासाठी तीन लाख रूपये प्रति कर्मचाऱ्यांसाठी तरतूद केली आहे. तसेच बँकेने केंद्र शासनाला आयकरापोटी 12 कोटी 30 लाख रूपयांचा भरणा देखील केला आहे. बँकेचे अध्यक्ष वसंत नागदे, उपाध्यक्ष वैजनाथ शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोडके यांनी नियोजन करून बँकेला सातत्याने समक्ष ठेवण्यात यश मिळवले आहे.


 
Top