धाराशिव (प्रतिनिधी) - बहिणीची बोनाफाईड सर्टीफिकेट व निर्गम उतारा देण्यासाठी 6 हजार रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी 5 हजार 800 रुपये रक्कम मुख्याध्यापकाच्या सांगण्यावरून सहशिक्षकाने स्विकारली. मात्र ती रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडून लाच स्विकारल्या प्रकरणी मुख्याध्यापक व सहशिक्षक दि.2 एप्रिल रोजी गजाआड केले होते. ॲड अमोल वरुडकर यांनी न्यायालयात यशस्वी युक्तिवाद केल्यामुळे त्यांना उमरगा जिल्हा न्यायालयाने दिनांक 3 एप्रिल रोजी नियमित जामीन मंजूर केला आहे.

उमरगा तालुक्यातील मुरुम येथील डॉ. झाकीर हुसेन उर्दु हायस्कूलमधील एका विद्यार्थिनीची बोनाफाईड सर्टिफिकेट व निर्गम उतारा देण्याची मागणी एका भावाने मुख्याध्यापकाकडे केली. यावेळी मुख्याध्यापक सईद अहमद मोहम्मद मकबुल अहमद (वय 57 वर्षे) व सहशिक्षक शहाजहान अब्दुल खय्युम पटेल (वय- 54 वर्षे), रा. 359, मुस्लीम पाच्छापेठ, नुरानी मस्जीदजवळ, सोलापुर. (वर्ग- 3) यांनी 6 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती 5 हजार 800 रुपये लाच देण्याचे ठरले. मात्र लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्यामुळे तक्रारदार भावाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.  तक्रारदार यांच्याकडून पंचांसमक्ष 5 हजार 800 रुपये रक्कम सहशिक्षक पटेल यांनी स्विकारली असता मुख्याध्यापक अहमद व सहशिक्षक पटेल यांना अटक केली. या प्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या लाचखोरी प्रकरणातील आरोपींचा उमरगा जिल्हा न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. आरोपींच्यावतीने ॲड. अमोल वरुडकर यांनी यशस्वी बाजू मांडली. ॲड.अमोल वरुडकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने मुख्याध्यापक व सहशिक्षक यांना जामीन मंजूर केला आहे.


 
Top