धाराशिव (प्रतिनिधी)- उस्मानाबाद लोकसभेसाठी महायुतीकडून भाजपाचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस  अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश करून उमेदवारी मिळवल्याने शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते कमालीचे नाराज असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आता महायुतीमध्ये शिवसेना गट काय भूमिका घेणार याकडे मतदारांचे लक्ष लागून राहीले आहेत. उमेदवार बदलला नाही तर सामूहिक राजनामे देण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. 

महायुतीत उस्मानाबादची जागा राष्ट्रवादीला सोडल्याने त्याला उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी यांचा विरोध दिसून येत आहे. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. कार्यकर्त्यांची बैठक होऊन कोणत्याही स्थितीत राष्ट्रवादीचे काम न करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. लोकसभेसाठी उस्मानाबाद लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा हक्काचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु, आता महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसला जागा सुटल्याने उमेदवारीवरून महायुतीत तणाव वाढला असल्याचे दिसून येत आहे. पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांना उमेदवारी मिळावी अशी येथील कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. परंतु, तसं न होता. भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी धाराशिवची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली.

पाटील यांचा पक्षप्रवेश करून घेऊन त्यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे शिवसेनेचा शिंदे गट आक्रमक भूमिकेत आला असल्याचे चित्र परंडा विधानसभा मतदारसंघात दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गट नाराज असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. दरम्यान, उस्मानाबाद मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तरीही भाजपला जागा सोडा. मात्र, राष्ट्रवादीला जागा सोडू नका असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागा परत घेऊन उमेदवार बदलावा असे कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्र्यांना साकडे घातले जात आहे. उमेदवारी बदलून जागा शिवसेनेला परत घ्यावी अन्यथा सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.


 
Top