धाराशिव (प्रतिनिधी) -लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धाराशिव शहरात पहिल्यांदा सभा होत आहे. मंगळवारी होत असलेल्या या ऐतिहासिक सभेसाठी 25 एकर क्षेत्रावर नियोजन केले जात आहे. महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या या सभेसाठी लाखाहून अधिक मतदार, कार्यकर्ते उपस्थित राहतील, असे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 

प्रतिष्ठान भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेस लोकसभा निरीक्षक खासदार अजित गोपछडे, लोकसभा निवडणूक प्रमुख नितीन काळे, सुधीर पाटील, चौरे, नेताजी पाटील आदी उपस्थित होते. महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मंगळवार दि. 30 एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी धाराशिवला जनतेशी संवाद साधण्यासाठी येणार आहेत.  तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयालगत असलेल्या 25 एकर क्षेत्रावर सभेचे नियोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री तानाजी सावंत आदींची उपस्थिती असणार आहे. 


 
Top