धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात पत्रकारांवर भ्याड हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असतानाच धाराशिव येथील पत्रकार रवींद्र केसकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्ह्यातील पत्रकारांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मंगळवारी (दि.2) पत्रकारांच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की, धाराशिव येथील पत्रकार रवींद्र केसकर हे सोमवार, 1 एपिल 2024 रोजी रात्री 7.45 वाजण्याच्या सुमारास कामकाज संपवून दुचाकीवरुन घराकडे जात होते. धाराशिव-बेंबळी रोडवर साळुंकेनगर नजीक अज्ञात चार ते पाच गुंडांनी त्यांना अडवले. त्यांना गाडीवर बसवून अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच प्रतिकार करताच धारदार शस्त्राने चेहऱ्यावर वार केला. यात रवींद्र केसकर हे जखमी झाले. हल्लेखोरांचा पवित्रा लक्षात आल्यानंतर त्यांनी बचावासाठी आरडाओरड केली, तेव्हा रस्त्यावरुन जाणारे दुचाकीस्वार तेथे जमा होऊ लागले. तेवढ्यात हल्लेखोरांनी श्री.केसकर यांची दुचाकी घेतली आणि ते तेथून पसार झाले. ही दुचाकी दूर अंतरावर वडगाव शिवारात सोडून दिली. या घटनेमुळे पत्रकारांवर हल्लेखोरांमार्फत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न दिवसेंदिवस वाढत जात असल्याचे दिसून येत आहे. जीवघेणा हल्ला करणाऱ्या या हल्लेखोरांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे. निवेदनाची प्रत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री यांनाही पाठविण्यात आली आहे.



 
Top