धाराशिव (प्रतिनिधी)-ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त धाराशिव शहरातील छत्रपती शाहुनगर काकडे प्लॉट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात अखंड शिवकथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास बुधवार, 3 एप्रिल रोजी भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला. कथा प्रवक्ते माहेश्वरमूर्ति वीरभद्र स्वामी यांच्या अमोघ वाणीतून शिवकथा श्रवणाचा लाभ यावर्षी भाविकांना मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ भक्त परिवारातील सर्व महिला भगिनींच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेल्या या सोहळ्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्याचा समर्थ भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

बुधवारी सकाळी 8 वाजता श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्था वतीने  हभप पांडुरंग महाराज लोमटे, हभप पांडुरंग महाराज जाधव, हभप एकनाथ महाराज मेंढेकर, वारकरी साहित्य परिषदेच्या धाराशिव तालुकाध्यक्ष हभप शोभाताई दिगंबर लंगडे, यांच्या हस्ते कलशपूजन करण्यात आले. तर वीणा पूजन टाळ पूजन व आरती सामाजिक कार्यकर्ते प्रशांत साळुंके यांचे हस्ते करण्यात आली.

त्यानंतर दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शिवकथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात कथा प्रवक्ते माहेश्वरमूर्ति वीरभद्र स्वामी यांनी शिवकथेचे निरुपण केले. सायंकाळी 6 ते 7 या वेळेत महिला हरिपाठ कार्यक्रम झाला. प्रारंभापासून सांगता सोहळ्यापर्यंत म्हणजेच 9 एप्रिल पर्यंत दैनंदिन हा कार्यक्रम नियमित राहणार आहे. 

बुधवार, 10 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता श्री स्वामी समर्थ महाराज यांची पालखी, दिंडी नगर प्रदक्षिणा होईल. त्यानंतर सकाळी 10 वाजता हभप शिवाजी घाडगे महाराज यांचे काल्याचे कीर्तनानंतर महाप्रसाद होईल. महाप्रसादाचे यंदाचे अन्नदाते तुकाराम पवार, डॉ.विभावरी थोरात व डॉ.विराज थोरात हे आहेत. या शिवकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचा श्री स्वामी समर्थ भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ भक्त परिवारातील महिला भगिनी व सहयोगी शाहुनगर, काकडे प्लॉट येथील भक्तगणांच्या वतीने करण्यात आले आहे.यावेळी हरिभक्त परायण पांडुरंग महाराज लोमटे, एकनाथ उर्फ काका महाराज मेंढेकर,हरिभक्त परायण बालाजी महाराज घाडगे सर, लंगडे ताई वारकरी परिषद तालुका अध्यक्ष,प्रशांत उर्फ बापू साळुंके शहर संघटक धाराशिव, प्रमोद लकडे,मेंढापुरकर, निकम काका, रामकृष्ण  फंड, लोमटे काका आगळे महाराज तुळजापूरे सर,प्रसाद महाराज घाडगे, सप्ताह नियोजनातील  सर्व महिला आयोजक व परिसरातील भाविक भक्त. उपस्थित होते.


 
Top