धाराशिव (प्रतिनिधी)-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील दोन प्रमुख उमेदवार अर्चना पाटील व ओम राजेनिंबाळकर या दोघांना ही खर्च कमी दाखविल्याच्या कारणावरून कारणे दाखवा नोटीस निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी बजावली आहे. 48 तासात उत्तर न दिल्यास खर्च शॅडो पथकाने दाखविलेला खर्च निवडणूक खर्चात दाखविला जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे शिवसेना युती तर्फे अर्चना पाटील या उमेदवार आहेत. तर ठाकरे गट शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाविकास आघाडीच्यावतीने विद्यमान खासदार ओम राजेनिंबाळकर हे उभे आहेत. सभा व रॅलीसाठी झालेला खर्च व निवडणूक आयोगाकडे दाखल केलेला खर्च यात तफावत असल्याने कारणे दाखवा नोटीस अर्चना पाटील व ओम राजेनिंबाळकर यांना बजावली आहे. ओम राजेनिंबाळकर यांनी 19 लाख 60 हजार खर्च दाखविला आहे. तर शॅडो पथकाने 33 लाख 92 हजार खर्च झाल्याचा अहवाल दिला आहे. तर अर्चना पाटील यांनी 4 लाख 55 हजार खर्च दाखविला आहे. तर शॅडो पथकाने हा खर्च 22 लाख 73 हजार असल्याचे म्हटले आहे. याबाबत 48 तासात उत्तर न दिल्यास शॅडो पथकाने दाखविलेला खर्च निवडणूक खर्चात दाखविला जाईल असे सांगितले आहे. 


 
Top