धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा महायुतीमध्ये राष्ट्रवादीने खेचून घेतला. त्यातही भाजपामधील अर्चना पाटील यांना प्रवेश देत उमेदवारी दिली. त्यामुळे राष्ट्रवादीतील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज असतानाच आत पालकमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विरोध केला आहे. धाराशिव लोकसभेला घड्याळ नको तर आम्हाला बाणच द्या, या मागणीसाठी मतदार संघातील शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली आहे. दरम्यान धनंजय सावंत यांच्याशी संपर्क केला असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, संध्याकाळी अजून चर्चा होणार आहे. पालकमंत्री तानाजी सावंत हे पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला जाणार आहेत. मतदारसंघातील एकूण परिस्थिती त्यांना सांगणार असल्याचेही सावंत यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

धाराशिव लोकसभेसाठी मागील पंचवार्षिक निवडणुकीत महायुतीमध्ये शिवसेनेला जागा सुटली होती. त्यामुळे यावेळी महायुतीमध्ये शिवसेनेला जागा मिळविण्यासत्तठी पालकमंत्री तानाजी सावंत यांनी प्रयत्न केले होते. त्यानुसार खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येवून गेले. त्यामुळे धाराशिवची जागा ही महायुतीमध्ये शिवसेनेला मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र ही जागा राष्ट्रवादीला मिळाली. पालकमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे उमेदवारी मिळावी यासाठी मुंबई येथे मुख्यमंत्री यांच्या व महायुतीच्या नेत्यांना भेटण्यासाठी भूम, परंडा, वाशी तालुक्यातून गाड्यांचा ताफा घेवून मुंबईला गेले आहेत. महाराष्ट्रात महायुतीमध्ये बंड होण्याच्या भितीमुळे अनेक ठिकाणचे उमेदवार ऐनवेळी बदलण्यात आले आहेत. सावंत यांच्या मागणीला प्रतिसाद न मिळाल्यास जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे.



 
Top