धाराशिव (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील येरमाळा येथे येडेश्वरी देवीची वार्षिक यात्रा सुरू आहे. यात्रेनिमित्त राज्य, परराज्यातून लाखो भाविक दाखल झाले होते. चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेवून अनेकांचे सोन्याचे दागिने, महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठन, पैशाची पाकिटे हातोहात लंपास केली. यात्रेसाठी येरमाळा येथे आलेल्या बसमधील डिझेलची चोरी केली. या प्रकरणी येरमाळा पोलिस ठाणे येथे दि. 25 एप्रिल रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी (जि. बीड) तालुक्यातील कन्हेरवाडी येथील सुरेश उर्फ नाना वसंतराव फड हे दि. 24 एप्रिल रोजी येरमाळा येथील यात्रेसाठी आले होते. चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेवून त्यांच्या गळ्यातील अंदाजे 70 हजार रूपये किंमतीचे दोन तोळे वजनाची सोन्याची चैन लंपास केली. येडेश्वरी यात्रेतील चुन्याच्या शेतात येरमाळा येथे ही चोरीची घटना घडली. या प्रकरणी सुरेश फड यांनी दि. 25 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून येरमाळा पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

उमरगा जि. धाराशिव आगारातील राज्य परिवहन महामंडळाचे बसचालक अयुब मकबुल नदाफ हे दि. 25 एप्रिल रोजी बस क्र. एमएच 20 बीएल 2701 व बस क्र. एमएच 20 बीएल 2630 या दोन बस घेवून येरमाळा मुक्कामासाठी थांबले होते. त्यावेळी चोरट्यांनी बसमधील अंदाजे 36 हजार 900 रूपये किंमतीचे 410 लिटर डिझेल चोरून नेले. या प्रकरणी बसचालक अयुब नदाफ यांनी दि. 25 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बार्शी जि. सोलापूर येथील केशरबाई माणिकराव घोलप या येरमाळा येथे यात्रेसाठी आल्या होत्या. दि. 24 एप्रिल रोजी चुन्याच्या रानात येडेश्वरी देवी पालखीच्या विसावा कट्टा येथे दर्शनसाठी गेल्या होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेवून चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील पावणे दोन तोळ्याचे सोन्याचे गंठन लंपास केले. या प्रकरणी केशरबाई घोलप यांनी दि. 25 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून येरमाळा पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे. 


 
Top