धाराशिव (प्रतिनिधी) - कोरोना काळानंतर महाराष्ट्रासह सबंध देशात वृत्तपत्र व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून खप आणि जाहिरातींचे प्रमाणही कमी झाले आहे. परिणामी वृत्तपत्र व्यवसायावर अवलंबून असणारे पत्रकार आणि इतर कर्मचाऱ्यांसमोर रोजगाराचाच प्रश्न निर्माण झाला आहे. देशभरात छोट्या-मोठ्या वृत्तपत्रांचा 35 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. यासाठी केंद्र सरकारने वृत्तपत्र खरेदी करणाऱ्या आयकरदात्यांना उत्पन्न करात वार्षिक पाच हजार रुपयांची सूट द्यावी अशी मागणी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी धाराशिव लोकसभेचे विद्यमान खासदार आणि महाविकास आघाडीचे विद्यमान उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे केली.यावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी वृत्तपत्र आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही मागणी रास्त असल्याने मी आपल्या आशीर्वादाने पुन्हा खासदार झाल्यावर लोकसभेमध्ये हा विषय निश्चित सभागृहात सरकार पुढे लावून धरेल असे अभिवचन दिले.

धाराशिव येथील पवन राजे कॉम्प्लेक्स येथे महाविकास आघाडीचे उमेदवार तथा धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांची पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, राज्य कार्यकारणी सदस्य बाबासाहेब देशमाने यांच्यासह धाराशिवचे जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील, पत्रकार संघाचे धाराशिव येथील पदाधिकारी श्रीराम क्षीरसागर, रामेश्वर डोंगरे सय्यद कलीम मुसा यासह पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांना अधिक माहिती सांगताना प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे म्हणाले की, केंद्र सरकार खाजगी विमा कंपन्यांचा व्यवसाय वाढावा आणि लोकांनी विमा घ्यावा यासाठी विमा घेणाऱ्या ग्राहकाला वार्षिक उत्पन्न करात एका विमा हप्त्या इतक्या रक्कमेची सूट दिली जाते. त्याचप्रमाणे वृत्तपत्र खरेदी करणाऱ्यांना आयकरात सुट द्यावी अशी मागणी करण्यात आले आहे.


 
Top