कळंब (प्रतिनिधी)-पर्याय संस्थेचे कार्यवाह, सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ अण्णा तोडकर यांनी मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेसोबत एक हजार केशर आंब्याचे वाटप सुरू केले आहे. या विवाह सोहळ्यात सर्व धर्माच्या धर्मगुरूंचे पूजन करून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या विवाह सोहळ्याच्या पत्रिकेला,“सर्वधर्म सन्मान विवाह सोहळा“ असे नाव देऊन एक आगळा वेगळा विवाह करण्याचा मानस त्यांचा आहे. पर्याय संस्थेचे कार्यवाहक, महाराष्ट्र लोकविकास मंच चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ तोडकर यांची मुलगी डॉ. हर्षदा व चि. अक्षय पटकुरे यांचा विवाह दोन मे रोजी सायंकाळी पर्याय संस्था येथे ठेवण्यात आला आहे.

या विवाह सोहळ्याच्या पत्रिकेसोबत प्रत्येकाला एक केशर आंब्याचे रोपटे भेट म्हणून दिले जात आहे. सर्व धर्मांचा सन्मान व्हावा यासाठी हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन, लिंगायत, या धर्मांचे धर्मगुरू उपस्थित राहणार आहेत, या धर्मगुरूंचा सत्कार करण्यात येणार आहे,  ते वधू वरास आशीर्वाद देणार आहेत. या विवाह सोहळ्यात महापूरूषांच्या  प्रतिमेचे व भारतीय संविधानाचे पूजन व शेवटी राष्ट्रगीत होणार आहे प्रसिद्ध गायक सारेगम फेम ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या मराठमोळ्या गायनांचा कार्यक्रम होणार आहे. नातेवाईक, मित्रमंडळी यांना पत्रिकेसोबत केशर आंब्याची झाड देवून, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न केले जात असून, प्रत्येकानी हे झाड लावावे ,अशी विनंती  विश्वनाथ तोडकर सौ. अनिता तोडकर हे करत आहेत. हा विवाह सोहळा सामाजिक भान ठेवून करण्यात येणार असून , आलेल्या पाहुण्यांचे हि हे रोपटे देवून सन्मान करण्यात येणार असल्याचे विश्वनाथ तोडकर यांनी सांगितले.


 
Top