कळंब (प्रतिनिधी)- भाजपाने आजवर उपभोगलेली सत्ता शेतकरी, कष्टकरी, बहुजनांच्या प्रश्नाला बगल देत भांडवलदारांच्या सोईची धोरणं ठरवणारी ठरली आहे. यामुळे अशा पुंजीवादी संस्कृती जपायचं काम करणाऱ्या सरकारला सत्तेवरून दुर करत कष्टकरी,वंचिताचे गाऱ्हाणं ऐकणारं सरकार आणण्यासाठी इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या उमेदवारांना आम्ही मदत करणार असल्याची भुमिका भारत जोडो अभियानाचे मराठवाडा समन्वयक विश्वनाथ तोडकर यांनी जाहिर केली. कळंब येथे भारत जोडो अभियानाची आगामी लोकसभा निवडणूक संदर्भातील भुमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार भवनमध्ये दि.10 एप्रिल 2024 रोजी पत्रकार परिषद आयोजित केली होती. 

यावेळी महाराष्ट्र लोकविकास मंचचे अध्यक्ष तथा भारत जोडो अभियानचे मराठवाडा समन्वयक विश्वनाथ तोडकर, जिल्हा समन्वयक सुभाष घोडके, तालुका समन्वयक माधवसिंह राजपूत उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना तोडकर यांनी माझं नाही ऐकलं तर बघतोच? ऐकलं तर तो धाडीच्या बाबतीत निश्चिंत असतो. एकुणच भिती घालून सरकार चालवले गेले. आपला देश संविधानावर चालतो, यामुळे एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाचे सरकार नको ही आमची भुमिका असल्याचे सांगितले. शेतकऱ्याविषयी सकारात्मक भुमिका नसलेलं सरकार नको तर शेतकऱ्यांचे अश्रू पुसणारे सरकार हवं. मागच्या काही वर्षात केवळ अशा घटकांचा विकास करण्याऐवजी केवळ लाभार्थी कम भिकारी बनवण्याचे धोरण राबवले गेले. सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नावर आवाज उठवणार्या, न्याय मागणाऱ्या चळवळीचे कंबरडे मोडण्याचे काम झाले. सर्वसामान्यांचे हक्क हिरावून घेणारी मंडळी पुन्हा सत्तेवर आली नाही पाहिजे यासाठी आम्ही नेटाने प्रयत्न करणार आहोत असेही तोडकर यांनी सांगितले.

भारत जोडो अभियान आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? कोणत्या घटक पक्षाला जागा? हे न पाहता केंद्रातील सत्तारूढ पक्षाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी महाविकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. मतविभाजन टाळण्यासाठी अनेकांशी संवाद साधणार आहोत. उमेदवाराच्या यशात निश्चितच आमचा खारीचा वाटा असेल असे सांगितले. यावेळी सुभाष घोडके यांनीही मार्गदर्शन करत भारत जोडो अभियान आजपासून महाविकास आघाडी उमेदवारांच्या विजयासाठी नियोजनबद्ध काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी माधवसिंह राजपूत यांनीही मार्गदर्शन केले. भारत जोडो अभियानाच्या वतीने 10 एप्रिल रोजी राज्यभर पत्रकार परिषदा घेऊन भाजपचा पाडाव करण्याचा संकल्प करण्यात आला.


 
Top