धाराशिव (प्रतिनिधी)- लोकसभेच्या इतिहासात आजवर केवळ 3 महिलांना उमेदवारी देण्यात आली. 1991 साली विमल नंदकिशोर मुंदडा, 2004 साली माजी खासदार कल्पना रमेश नरहिरे नंतर तिसऱ्यांदा 2024 मध्ये अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांच्या रूपाने महिला उमेदवाराला संधी मिळणार आहे. अर्चना पाटील यांचा सामना शिवसेनेचे ओम राजेनिंबाळकर यांच्या विरोधात होणार आहे. शिवसेनेच्या कल्पना नरहिरे यांचा 1 हजार 649 मतांनी विजय झाला होता. तर भाजपच्या विमल मुंदडा या 83 हजार 055 मतांनी पराभूत झाल्या. आगामी लोकसभा निवडणुकीत मतदार काय कौल देतात यांची उत्सुकता वाढली आहे.

अर्चना राणाजगजितसिंह पाटील या राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी तथा धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष आहेत. लेडीज क्लब या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा असून, धाराशिव जिल्ह्यात मोठे महिला संघटन, दांडिया महोत्सव, नवरात्र यासह अन्य महिलांचे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर महिलांच्या देवदर्शन सहली काढणे. आदीबाबत अर्चना पाटील यांनी अनेकदा पुढाकार घेतला आहे. अर्चना पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने महिलात जल्लोषाचे वातावरण आहे.

धाराशिव लोकसभेत 20 लाख 8 हजार 92 इतके मतदार असून, त्यात 9 लाख 46 हजार 54 मतदार या महिला असून, 10 लाख 58 हजार पुरूष मतदार आहेत. महिला उमेदवार आल्यास महिला मतदारांचे मत निर्णायक ठरू शकते. 1991 सालच्या लोकसभा निवडणुकीत अरविंद कांबळे (काँग्रेस) यांनी 2 लाख 36 हजार 627 मते मिळाले. तर विमल नंदकिशोर मुंदडा (भाजप) यांना 1 लाख 53 हजार 572 मते मिळाली. तर 2004 च्या लोकसभा निवडणुकीत कल्पना रमेश नरहिरे (शिवसेना) यांना 2 लाख 94 हजार 436 मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे लक्ष्मण ढोबळे यांना 2 लाख 92 हजार 787 मते मिळाली. 


 
Top