धाराशिव (प्रतिनिधी)-महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयांतर्गत शासकीय परिचारिका महाविद्यालयाच्या दोनशे विद्यार्थ्यांनी शनिवारी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सलग बारा तास अभ्यास करून डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले.

शहरातील शासकीय परिचारिका महाविद्यालयातील जीएनएम व एएनएम वर्गातील विद्यार्थिनींनी शनिवार, 13 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभ्यास अभिवादन उपक्रमास प्रारंभ केला. यावेळी डॉ. सचिन देशमुख, डॉ. महेश कानडे, डॉ. नितीन भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. या अभ्यास अभिवादनात विद्यार्थिनींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणारी विविध पुस्तके वाचली. यात बुध्द आणि त्यांचा धम्म, भारतीय राज्यघटना, दलितांचे प्रश्न, शुद्र पूर्वी कोण होते? ही पुस्तके वाचण्यात आली. अभ्यासकांंसाठी चहा, नाष्टा, फळे व जेवनाची सोय आयोजकांच्यावतीने करण्यात आली होती. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य माधव सरवडे, प्रा. बापूराव डोंगरे, रवींद्र सुरवसे, श्रीधर भांगे, शुभदा जकाते, अनुजा शेळकीकर, श्रध्दा वाघमारे, रेखा मुळे, सुमित्रा गोरे, समुपदेशक सिध्दार्थ जानराव आदींनी परिश्रम घेतले.


अभ्यास उपक्रम सर्वत्र व्हावेत

सलग 12 तास अभ्यास उपक्रमाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. एकाच ठिकाणी एकाग्रतेने केलेल्या वाचनामुळे पुढील काळातही तेवढाच अभ्यास करू शकते, याची जाणिव झाली आहे. त्यामुळे हा उपक्रम सर्वत्र आयोजित होणे गरजेचे आहे, असे मत अभ्यासिका वैष्णवी नंदकुमार गायकवाड यांनी व्यक्त केले.


 
Top