धाराशिव (प्रतिनिधी)-  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 40 - उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी 12 एप्रिलपासून नामनिर्देशनपत्र भरण्यास प्रारंभ होणार आहे.नामनिर्देशनपत्र दाखल करतांना उमेदवारांनी घ्यावयाच्या काळजीबाबत भारत निवडणूक आयोगाकडून सर्वसाधारण सूचना निर्गमित करण्यात आल्या आहे. उमेदवारांनी त्या सूचनांप्रमाणे अर्ज दाखल करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी केले आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे भरण्याकरिता फॉर्म 2 ए (कोरे) निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात तसेच भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नामनिर्देशपत्रे अधिसुचित केल्यानुसार दि.12 एप्रिल ते दि.19 एप्रिलपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 च्या दरम्यान सार्वजनिक सुट्टीव्यतिरिक्त उमेदवाराद्वारे किंवा त्याच्या सुचकाद्वारे निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष सादर करणे आवश्यक आहे. 

उमेदवाराला नामनिर्देशनपत्र भरण्याकरिता <https://suvidha.eci.gov.in> या संकेतस्थळावर ऑनलाईन माहिती भरण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. तथापि ऑनलाईन अर्ज भरणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन केलेल्या अर्जाची क्युआर कोड असलेली प्रिंट काढून त्यावर स्वतःची सही करुन तसा अर्ज स्वतः अथवा त्याच्या सुचकामार्फत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष सादर करणे बंधनकारक राहील. लोकसभा निवडणुकीकरीता अनामत रक्कम सर्वसाधारण उमेदवारांकरीता 25 हजार रुपये आणि अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती उमेदवारांकरीता 12 हजार 500 रुपये इतकी आहे.मागासवर्गीय उमेदवाराने सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्राची प्रत नामनिर्देशनपत्रासोबत जोडणे आवश्यक आहे.


 
Top