भूम (प्रतिनिधी)- दुधाला अत्यल्प भाव यामुळे तालुक्यातील दुधाचे अर्थकारण बिघडले आसल्याने दुध उत्पादक शेतकरी यांना आर्थीक फटका सहन करावा लागत आहे. तालुक्यात दुग्ध व्यवसायावर अर्थकारण चालते. त्यामुळे तालुक्यात शेतीसोबत दुग्ध व्यवसाय केला जातो अनेक शेतकरी पशुपालन करुन दुग्ध व्यवसाय करतात तालुक्यात एकूण 1 लाख 24 हजार 835 पशुधन असून यामध्ये दुभत्या पशुधनाची संख्या अधिक आहे. दैनंदिन तालुक्यात आजमितीला 1 लाख 50 हजार लिटर दुध संकलन होत आहे. वाढत्या तापमानाचा दुध संकलनावर फारसा परिनाम नसला तरी दुधाचे दर स्थिर राहत नसल्याने दुध उत्पादक शेतकरी यांना मात्र आर्थीक फटका बसत आहे.
सध्या 3.5 व 8.5 ला शासनाचा 25 रु लिटर दर मिळत आहे. तर खाजगी दुध संस्थांनकडून 3.5 व 8.5 ला 27 रु दर दिला. तर म्हशीच्या दुधाला 43 रु दर मिळत आहे. एकंदरीत दुग्ध व्यवसाय करताना दुभत्या पशुधनाचे संगोपन, चारा, पशुखाद्या याचा खर्च पाहता गेल्या काही महिन्यापासून ना नफा ना तोटा यावर दुग्ध व्यवसाय सुरु असल्याचे शेतकरी सांगतात. दुग्ध व्यवसायात कमी दराचा फटका बसत असल्याने परिनाम तालुक्यातील बाजारपेठेवर होताना दिसत आहे. यासाठी सरकारने दुधाचे दर कायम ठेवावेत अशी मागणी दुध उत्पादक शेतकरी करत आहेत. चारा महागला, सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने हिरवा चारा उपलब्ध नाही. नविन आलेला ज्वारी कडबा यांचे भाव गगणाला भिडले आहेत. सध्या शेकडा कडबा 3000 रुपये आहे. तर पशुखाद्याचे भाव किलोप्रमाणे 30 ते 40 रु. किलो असल्याने दुग्ध व्यवसायातून तुटपुंजी रक्कम हाती राहत असल्याने दुग्ध व्यवसायाचे सध्या अर्थकारण बिघडले आहे. अनुदानाचा पत्ता नाही सरकारने शेतकरी यांना प्रतिलिटर 5 रु प्रमाणे अनुदान थेट शेतकरी यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती. यासाठी असलेल्या अटी, शर्ती शेतकरी यांनी पुर्ण केल्या असल्यातरी हे अनुदान वाटपाच्या याद्या संबंधित विभागाने तयार करुन देखील शेतकरी आजही अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत.