धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हयाला 2 राज्यांच्या सीमा लागून आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत इतर राज्यांमध्ये गर्भपात करण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे येथील गरोदर महिला त्याठिकाणी जाऊन अवैध गर्भपात करण्याच्या घटनाही घडल्या आहेत. गेल्यावर्षी जिल्हा पीसीपीएनडीटी समितीने गुलबर्गा येथे याबाबतची कारवाई केली होती. जिल्ह्यात पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असून मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढण्यासाठी जिल्हा सल्लागार समिती सतर्क असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.इस्माईल मुल्ला यांनी केले.

डॉ.मुल्ला यांच्या अध्यक्षतेत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात आज 6 मार्च रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी ते बोलत होते.अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तानाजी लाकाळ, पीसीपीएनडीटी  नोडल अधिकारी डॉ. दत्तात्रय खुणे,जिल्हा शासकीय  अभियोकता ॲड.शरद जाधवर, आयएमए अध्यक्ष डॉ.सचिन देशमुख, वरिष्ठ स्त्री रोग तज्ञ तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ.स्मिता गवळी/सरोदे, माहिती अधिकारी यासेरोद्दीन काझी व पीसीपिएनडीटी कायदेविषयक सल्लागार ॲड.रेणुका शेटे यांची या बैठकीला उपस्थिती होती. जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली.संशयित सोनोग्राफी केंद्रावर डिकॉय केस करणे,सोनोग्राफी केंद्र तसेच गर्भपात केंद्राची त्रैमासिक तपासणी करणे,विविध बैठकांचे आयोजन करणे,सोनोग्राफी केंद्राचे नूतनीकरण,अशा इतर विविध विषयावर चर्चा करण्यात आली. 


 
Top