उमरगा (प्रतिनिधी)-शिवसेनेचे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे.  आमचे हिंदुत्व चुली पेटविणारे असून भाजपचे हिंदुत्व घरे पेटविणारे आहे. आपला देश हाच माझा धर्म असून देशाची लोकशाही वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. असा घणाघात शिवसेनेचे पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

उमरगा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या कै. शिवाजी मोरे क्रीडा संकुलाच्या मैदानावर गुरुवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी शिसेनेचे नेते संजय राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे,विरोधी पक्ष नेते रावसाहेब दानवे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, मिलींद नार्वेकर, आमदार कैलास पाटील, सुरेश वाले, बाबा पाटील, अश्लेष मोरे आदींची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलतांना ठाकरे म्हणाले की, भाजपचे अमित शहा यांनी मला अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचं सांगितले होते. हे मी आई जगदंबेची शपथ घेऊन सांगतो. पण त्यानीं तो शब्द पाळला नाही म्हणून युती तुटली आणि त्यानीं गदारांना खोके देऊन माझे सरकार पाडले. शिवसेना फोडली नाही अजूनही शिवसेना अभेद्य असून, भाजपचे पाचशे बावनकुळे आले तरी ती संपणार नाही. माझा सामान्य शिवसैनिक आजही शिवसेनेवर जीवापाड प्रेम करतो असे ते म्हणाले. 

या वेळी संजय राऊत, सुषमा अंधारे, अंबादास दानवे,ओमप्रकाश राजेंनिंबाळकर, आदींची भाषणे झाली.कार्यक्रमास काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,वंचीत आघाडी आदींचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती रणधीर पवार, तालुका शिवसेना प्रमुख बाबुराव शहापुरे, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, बसवराज वरनाळे, दीपक जवळगे, विजयकुमार नागणे, राजेंद्र सूर्यवंशी सुधाकर पाटील, आदींनी परिश्रम घेतले.


नितीनजी भाजपला सोडून द्या 

भाजपच्या पहिल्या यादीत नितीन गडकरी यांचे नाव नाही. ज्यांनी भाजपा वाढवले त्याना बाजूला सारून गद्दारी करणाऱ्याना तिकिटे दिली जात आहे. या पहिल्या यादीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाबरोबरच महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री कृपाशंकरसिंह यांचेही नाव उमेदवारी यादी जाहीर झाले आहे. ज्या कृपाशंकरसिंह विरोधात भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांचे नाव प्रधानमंत्री यांच्या बरोबरीने उमेदवारी यादी आल्याबद्दल टिका करण्यात येत आहे.


 
Top