धाराशिव (प्रतिनिधी)- जात पडताळणी प्रमाणपत्राची डिजिटल स्वाक्षरी असलेली प्रत देण्यासाठी 3200 रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी अधिकाऱ्यांसह खाजगी इमसाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जात पडताळणी कार्यालयातील प्रकल्प सहायक बुध्दभुषण दिलीपराव माने यांनी तक्रारदाराच्या मुलीचे डिजिटल स्वाक्षरी असलेले जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी 3 हजार 200 रूपयांची लाच मागितली होती. ती लाच तक्रारदाराने पंचासमक्ष शाहबाज शफीक सय्यद रा. आगडगल्ली, धाराशिव याच्यामार्फत दि. 18 मार्च रोजी दिली. माने यांनीही ती स्विकारली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांनाही अटक केली. याबाबत आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान दि. 19 मार्च रोजी केलेल्या दुसऱ्या एका कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वाशी येथे दुय्यम निबंधक कार्यालयातील (रजिस्ट्री ऑफिस) प्रभारी अधिकारी तथा लिपीकाला 10 हजार रूपयांची लाच घेताना पकडले. कडकनाथवाडी येथील एका शेतकऱ्याच्या दोन दस्त नोंदणी करण्यासाठी प्रत्येकी पाच हजार रूपयांप्रमाणे 10 हजार रूपयांची लाच प्रभारी दुय्यम निबंधक संजय भीमराव गडकर यांनी मागितली होती. पंचासमक्ष त्याने ती स्विकारल्याने पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोन्ही कारवाया बाबत संभाजीनगरचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे तर अप्पर पोलिस अधीक्षक मुकूंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सिध्दराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. धाराशिव येथील सापळा पथकामध्ये पोलीस अंमलदार मधुकर जाधव, विशाल डोके, सचिन शेवाळे, अविनाश आचार्य, नागेश शेरकर यांचा समावेश आहे. तर वाशी येथील सापळा पथकामध्ये पोलीस अमलदार इफ्तेकार शेख, दिनकर उगलमुगले, सचिन शेवाळे यांचा समावेश आहे.


 
Top