धाराशिव (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत. महाविकास आघाडीच्यावतीने विद्यमान खासदार ओम राजेनिंबाळकर यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर झाले आहे. परंतु महायुतीकडून कोणाचेही नाव जाहीर झाले नसले तरी भाजपकडून प्रविणसिंह परदेशी यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपमधील अनेक नेत्यांमध्ये परदेशी यांच्या उमेदवारीवरून नाराजी असून, पक्षश्रेष्ठीने विश्वास न घेता परेदशी यांचे नाव कसे काय पुढे आणले? याविषयी चर्चा सुरू आहे.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ काँग्रेसनंतर गेल्या काही वर्षापासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. शिवसेनेमध्ये उभी फुट पडल्यानंतर मात्र ठाकरे गटाची शिवसेना जिल्ह्यात मजबूत असल्याचे मानले जात आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीच्यावतीने उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाच्या शिवसेनेला देवून उमेदवार म्हणून विद्यमान खासदार ओम राजेनिंबाळकर यांचे नाव जाहीर झाले आहे. महायुतीकडून मात्र लोकसभा निवडणुकीसाठी कोणाचेही नाव जाहीर नसले तरी शिंदे शिवसेनेचे पालकमंत्री तानाजी सावंत हे पुतण्यासाठी आग्रही आहेत. परंतु ते सोलापूर जिल्ह्यातील असल्यामुळे साखर कारखाने मात्र धाराशिव जिल्ह्यात असल्याने मतदार त्यांना कितपत प्रतिसाद देतील हे सांगता येत नाही. विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीत डॉ. पद्मसिंह पाटील व राणाजगजितसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना उस्मानाबाद जिल्ह्यात  त्यांचा प्रभाव होता. डॉ. पद्मसिंह पाटील सध्या राजकारणात सक्रीय नाहीत. तर तुळजापूर विधानसभेचे आमदार राणाजगजितसिंह पाटील भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार हे स्वतः लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत आग्रही आहेत. 

तर भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरी पक्षश्रेष्ठीच्या मनात निवृत्त आयएएस अधिकारी प्रविणसिंह परदेशी यांचे नाव फायनल असल्याचे समजते. यावरून भाजपमधील स्थानिक नेत्यामध्ये नाराजी पसरली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस निष्ठवंत भाजपच्या स्थानिक नेत्यांना विचारात घेवून राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले राणाजगजितसिंह पाटील यांना तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.  परंतु2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे पक्षश्रेष्ठी स्थानिक नेत्यांना न विचारता उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी वरून उमेमदवार लादला जात आहे अशी भावना काही नेत्यांत व कार्यकर्त्यांत निर्माण झाली आहे.


 
Top