धाराशिव (प्रतिनिधी)-सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाण्यासाठी वन्य प्राण्यांची भटकंती होते. पर्यायाने रस्त्यावर येणे, गावात शिरणे असा प्रकार होवून अपघातातही मृत्य पावणे अशा घटना वारंवार घटत आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटत आहे. त्यासाठी आता रुपामाता फाउंडेशनने पुढाकार घेतला असून वन परिक्षेत्र कार्यालयाकडे जागतिक वन दिनी गुरुवारी (दि.21) जिल्ह्यातील असणाया पानवठ्यात तात्काळ पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी वन रक्षक अधिकारी पी.डी. मिटकरी यांच्याकडे केली आहे. तसेच सुरवात म्हणून पुढील महिन्यात रुपामाता फाउंडेशनचे सचिव ॲड. अजित गुंड यांनी एका पानवठ्यात पाणी सोडण्याची जबाबदारी स्विकारली आहे.

धाराशिव जिल्ह्यात उन्हाळा सुरू होताच वन्यप्राण्यांची पाण्यासाठी वणवण सुरू होते. जिथे वनविभागाचे पाणवठे आहेत, त्यात पाणी पुरवठा नियमितपणे व्हावा. धाराशिव तालुक्यात शेकडो एकरावर वन क्षेत्र आहे. यात हरीण, ससे, कोल्हे, लांडगे, बिबटे यासह इतर वन्यप्राणी आहेत. तसेच शेकडो मोरासह इतर सर्व प्रकारचे पक्षी आढळतात. या सर्व प्राणी पक्षांची उन्हाळ्यात पाण्यासाठी मोठी तडफड होते. हे प्राणी पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे धाव घेतात. अंधारात पाण्याच्या शोधात हे प्राणी कधी शेततळ्यात अडकतात तर कधी विहीरीत पडतात. तर अनेकदा पाळीव कुत्र्यांचे भक्ष्य बनतात व काही हायवेवर वाहनाखाली येतात. मानवी दृष्टिकोनातून जंगलातील प्राण्यांच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी ही प्रथमत: शासनाची व नंतर समाजाची पण जबाबदारी आहे. तसेच सामाजिक संस्था व वन्यजीव प्रेमी व दानशूर व्यक्तींनी पण यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. या अनुषंगाने आपणास यासाठी निधी उपलब्ध होत नसल्यास शासकीय स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी एक जबाबदार संस्था म्हणून आम्ही सोबत असून धाराशिव तालुक्यातील वनविभागातील एखाद्या सुयोग्य पाणवठ्यामध्ये आमची संस्था स्वखर्चाने पाणी पुरवठा करण्यास तयार असल्याचे ॲड.अजित गुंड यांनी यावेळी सांगितले. यावेळी रुपामाता मिल्कचे जनरल मॅनेंजर मनोहर लोमटे, गजानन पाटील, तुषार पाटील आदींची उपस्थिती होती.


 
Top