धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिवचे समाज कल्याणचे सहायक आयुक्त बाळासाहेब अरवत यांनी धाराशिव शहरातील दंगल प्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यासाठी शासकीय पंच न देता असहकार्य केले. असा ठपका ठेवत अरवत यांच्यावर थेट धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या पोलीस कारवाई विरूध्द समाजकल्याण कार्यालयातील कर्मचारी आक्रमक झाले असून सहाय्यक आयुक्त अरवत यांच्यावरील गुन्हा रद्द करण्यात यावा, अन्यथा लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशारा आहे. शनिवारी (दि.30) निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे देण्यात आला.

कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 2015 साली तत्कालीन शासनाच्या गृह विभागाने निर्गमित केलेल्या निर्णयानुसार खाजगी पंचा ऐवजी शासकीय कर्मचाऱ्यांना पंच म्हणून घेण्याचे आदेश आहेत. मात्र एकाच शासकीय कर्मचाऱ्यास अनेक गुन्ह्यात वारंवार पंच म्हणून घेण्यात येऊ नये. असेही स्पष्ट आलेले आहे. तरीही दर मंगळवारी समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांना पंच म्हणून बोलावण्यात येत होते. परिणामी एकाच कर्मचाऱ्यास अनेक गुन्ह्यात पंच म्हणून अनेकदा पोलिसांनी बोलावून घेतले होते. यामुळे कार्यालयीन कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. संबंधित शासन आदेशाचे उल्लंघनही संबंधित यंत्रणेकडूनच होत आहे. असे समाज कल्याण अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान येथील समाज कल्याण कार्यालयात 21 मंजूर पदे असताना 7 पदे रिक्त आहेत. कार्यरत 14 पैकी एकाची नांदेड येथे प्रतिनियुक्ती झालेली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांवर कार्यालयीन कामकाजाचा अतिरिक्त ताण आहे. त्यात दर मंगळवारी पोलीस पंचनाम्यासाठी दोन कर्मचारी देण्यात आल्यास या कार्यालयाच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना आणि महसुलच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना अनेकदा कळविलेले आहे. मात्र यावर अद्याप कांही निर्णय झालेला नाही. शहरात शेकडो शासकीय कार्यालये आणि हजारो कर्मचारी आहेत. तरीही महसुलच्या तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांनी केवळ सात कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांच पोलिस पंचनाम्यासाठी पंच म्हणून हजर राहण्यासाठी आठवड्याचे वेळापत्रक ठरवून दिलेले आहे.

सहाय्यक आयुक्त बाळासाहेब अरवत यांच्यावरील दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ रद्द करण्यात यावा, अन्यथा लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर समाज कल्याणचे निरीक्षक युवराज भोसले, अतुल जगताप, दत्तात्रय कुंभार, प्रभाकर शेळके, मोहन शिंदे, बप्पा नाईकनवरे, व्ही. एच. राठोड, मुकाटे, एस. व्ही.एस.एस. जगताप, पी.बी. शिंदे, एस.पी. वेदपाठक, एस. व्ही. गाढवे, ए. एस. शितोळे, बी. के. पाटील, ओ. आर. सानप, बी.डी. भिसे, बी. डी. सिरसाट, एस. ए. गवळी, एस. के. भोसले, एस. एस. भोसले, डी.आर. भोयटे, आर.एस. एन.एस. गुरुव, एम. व्ही.एस.एस. काकडी, वाय. एस. चव्हाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 
Top