कळंब (प्रतिनिधी)- नगर परिषद कडे येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे यांनी माहिती अधिकार अर्ज करुण नगर परिषदेत एकुण असलेले विभाग व त्याविभागांचे जन माहिती अधिकारी कोण आहेत याविषयी माहिती मागीतली होती. त्यावर नगर परिषदेत एकुण 30 विभाग असून त्यासर्व विभागांची नावे तसेच जन माहिती अधिकाऱ्यांची नावे व पदनाम याची माहिती नगर परिषदेने मुळे यांना दिली. ज्यामध्ये 3 शिपाई, 1 सफाई मजूर व 1 मुकदम यासारख्या चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना जनमाहिती अधिकारी म्हणून नियुक्त केले असल्याची धक्कादायक गोष्ठ उघडकिस आली. 

याविषयी राहुल मुळे यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे केलेल्या तक्रारीत म्हणटले आहे कि, माहिती आयोगाने यापुर्वी एका प्रकरणात स्पष्ट केले कि, माहिती अधिकार कायद्यात कर्मचारी हा शब्द नसून अधिकारी हा शब्द नमूद आहे. त्यामुळे जनमाहिती अधिकारी हे वर्ग-1 किंवा वर्ग-2 चे अधिकारी असणे बंधनकारक आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने 1 फेब्रुवारी 2017 ला परिपत्रक काढून कामाचा पुरेसा अनुभव व दर्जा असणाऱ्या योग्य वरिष्ठतेच्या अधिकाऱ्यांची जनमाहिती अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी असे आदेश दिले आहेत. कळंब नगर परिषद मुख्याधिकारी यांनी शिपाई, सफाई मजूर व मुकदम यासारख्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना जनमाहिती अधिकारी म्हणून केलेल्या नियुक्त्या तात्काळ रद्द कराव्यात अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्याकडे केली आहे.


 
Top