तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे शहीद-ए-आजम भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या स्मरणार्थ शहीद दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी शहीद भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमांचे पूजन प्र. प्राचार्य मेजर डॉ. प्रोफेसर यशवंतराव डोके यांच्या हस्ते करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी वरील प्रतिपादन केले. 

ते पुढे म्हणाले की,23 मार्च 1931 रोजी या 20 वर्षीय तरुणांना लाहोर मध्ये फाशी देण्यात आली, पण त्यांचे कार्य इथेच संपत नाही कारण आजची देशातील पिढी कोणत्या मार्गाने जात आहे या गोष्टीचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. विशेष बाब म्हणजे हे तिन्ही शहीद जवान वेगवेगळ्या प्रांतातून केवळ देशासाठी एकत्र आले होते. आजचा तरुण कशासाठी एकत्र येतो हा संशोधनाचा विषय आहे. जुलमी ब्रिटिश राजवटीतून देशाला मुक्त करण्यासाठी, 'सरफरोशी की तम्मन्ना अब हमारे दिल में है, देखना है ज़ोर कितना बाजू ए कातिल में है' या संदेशांच्या माध्यमातून देशात त्यावेळी त्यांनी क्रांतीची ज्योत प्रज्वलित केली आणि भारतमातेचे हे विर सपूत वंदे मातरमच्या घोषणा देत आनंदाने शहीद झाले. कदाचित आयते मिळालेल्या स्वातंत्र्याचे आम्हाला महत्व नाही म्हणून पिढ्या व्यसनाधीन आणि ध्येय हिन होत चालल्या आहेत. हे सर्व तरुणांसाठी लागू होत नाही परंतु असे अनेक तरुण आहेत की त्यांना आपल्या समाजाप्रती कोणत्याही प्रकारची आस्था नाही. हे ईश्वराकडून मिळालेले आयुष्य फार कमी आहे, म्हणजेच आपल्याकडे वेळ फार कमी आहे. या कमी वेळेत आपण देशासाठी, समाजासाठी एकत्र येऊन लोकशाही अबाधित ठेवायची की फक्त शून्य होऊन आहे ती परिस्थिती स्वीकारायची हे ज्याचे त्याने ठरवायचे. अगोदर देश आणि देशाप्रती अभिप्रेत असलेला धर्म पाळणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रा.जे.बी क्षीरसागर, डॉ.नेताजी काळे, डॉ.सी.आर दापके, कार्यालयीन अधिक्षक सुमेर कांबळे यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मंत्री आर. आडे यांनी तर आभार मराठी विभाग प्रमुख प्रा. राजा जगताप यांनी मानले.


 
Top