धाराशिव (प्रतिनिधी)-पिण्याच्या पाण्यासाठी कोणाचीही गैरसोय होणार नाही याचे कटाक्षाने पालन करावे, यात दिरंगाई खपवून घेतली जाणार नसून नागरिकांना पायपीठ करायला लागू नये यासाठी विहिर/बोअर अधिगृहण, टँकर यासह आवश्यक त्या उपाय योजना तातडीने राबविण्याच्या सूचना आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिव व तुळजापूर येथे दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व गट विकास अधिकाऱ्यांना दिल्या.

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी काल तहसिलदार, गट विकास अधिकारी, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांच्यासह तालुका स्तरावरील विभाग प्रमुखांची धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाच्या सभागृहामध्ये तर तुळजापूर येथे पंचायत समितीच्या सभागृहामध्ये बैठक घेतली. तालुक्यातील सर्व गावाच्या सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा प्रश्नवलीच्या माध्यमातून भरून घेतला. त्यामुळे कुठल्या गावात किती विहीर, बोअरवेल यांचे अधिग्रहण करण्यात आले आहे, पाणी टंचाई किती आहे, टँकरची आवश्यकता आहे का, रोजगार हमी योजनेची कामे, चाऱ्याची उपलब्धता याबाबतची सविस्तर माहिती घेण्यात आली.

सदरील बैठकीस नितीन काळे, उपविभागीय अधिकारी संजय कुमार ढवळे, तहसीलदार धाराशिव मृणाल जाधव, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग धाराशिव सरवदे, गटविकास अधिकारी कांबळे, माजी सभापती बालाजी गावडे, तसेच तुळजापूर येथील बैठकीस तहसीलदार तुळजापूर अरविंद भोळंगे, मुख्याधीकारी लक्ष्मण कुंभार, नायब तहसीलदार संताष पाटील, पाणी पुरवठा उप अभियंता भोई, महिला बालविकास अधिकरी गोरे यांच्यासह धाराशिव व तुळजापूर तालुक्यातील सरपंच, तलाठी व ग्रामसेवक उपस्थित होते.


 
Top