धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्हयात आरोग्य विभागात उत्कृष्ठ काम करणाऱ्या गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांना 13 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात  आयोजित एका कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

आरोग्य विभागातील  गुणवंत अधिकारी-कर्मचारी बक्षीस योजना सन 2023-2024 या वर्षामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना बक्षिस वितरण या कार्यक्रमात करण्यात आले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली हा बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला.

यावेळी जिल्हयातील गुणवंत अधिकारी व कर्मचारी यांनी आरोग्य विभागात आहोरात्र आरोग्य सेवा देवुन आरोग्य संस्था उपकेंद्र,प्राथमिक आरोग्य केंद्र व कार्यालयामध्ये केलेल्या कामाचे मुल्यांकन करुन एकुण 63 अधिकारी व कर्मचारी यांची निवड करण्यात आली.यामध्ये गुणवंत अधिकारी व कर्मचारी 30 संवर्गातील प्रथम पुरस्काराकरिता 32 अधिकारी, कर्मचारी व व्दितीय पुरस्काराकरिता 31 अधिकारी व कर्मचारी यांना पुरस्कार देण्यात आले.

कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक श्रीमती प्रांजल शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) सुर्यकांत भुजबळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) शाम गोडभरले व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरीदास, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनयशील कुलकर्णी,सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ.मारोती कोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.रफीक अंसारी, जि.प. प्रक्षिशण संघाचे वैदयकिय अधिकारी डॉ.दिपक मेढेंकर तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थीत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरीदास यांनी प्रास्ताविक केले.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक श्रीमती प्रांजल शिंदे व पुरस्कार प्राप्त अधिकारी कर्मचारी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी केले.जिल्हा रुग्ण कल्याण समितीचे कार्यक्रम समन्वयक किशोर गवळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.


 
Top