तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील पांगरदरवाडी ग्रामपंचायतच्या वतीने सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या मुलींच्या लग्नाचा व शिक्षणाचा खर्च व्हावा या उद्देशाने  केंद्र सरकार आणि राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या बँक व पोस्ट ऑफिस मार्फत गुंतवणुकीच्या व बचत ठेवीच्या माध्यमातून बेटी बचाव बेटी पढाओ  अंतर्गत सुकन्या समृद्धी योजना  सुरु करण्यात आली. या योजनेला नागरिकांमधून प्रतिसादही चांगला मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून “बेटी पढाओ बेटी पढाओ“ हा उद्देश साध्य करण्याचा सार्थ हेतू आहे. केंद्र शासनाच्या याच हेतूला प्रतिसाद देत तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी ग्रामपंचायतने गावात जन्मणाऱ्या मुलींचे या योजनेत खाते काढून त्यांचे पहिले पाच हप्ते भरण्याचा आदर्शवत निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिसमध्ये दोन मुलींच्या नावे खाते काढून हप्ते भरुन सुरु केली आहे. या स्तुत्य उपक्रमाचे पांगरदरवाडी ग्रामपंचायतचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

केंद्र सरकारने मुलींचा जन्मदर वाढावा या उद्देशाने “बेटी पढाओ बेटी पढाओ “ या अभियानाअंतर्गत सुकन्या समृध्दी योजना पोस्ट ऑफिस मार्फत सुरु केली आहे. यामध्ये किमान पाचशे रुपयांपासून पुढे दरमहा पालक आपल्या मुलीच्या नावे बचत करुन त्याचा मुलीचे वय 18 ते 21 झाल्यानंतर तिच्या शिक्षणा व लग्नावेळी चांगला परतावा घेऊ शकतील हा या मागचा उद्देश आहे. सरकारच्या या उद्देशाला तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी ग्रामपंचायतने आणखी बळ दिले आहे. जानेवारी 2024 ला झालेल्या ग्रामसभेत एका महत्वाकांक्षी निर्णयाचा ठराव घेण्यात आला. यामध्ये गावातील कोणाच्याही घरामध्ये मुलीचा जन्म झाल्यास ग्रामपंचायतीमार्फत त्या मुलीच्या नावे सुकन्या समृध्दी योजनेत खाते उघडून त्या योजनेचे पहिले प्रति एक हजार प्रमाणे पाच हप्ते भरण्याचा ठराव घेण्यात आला. त्यानुसार ग्रामपंचायतने या ठरावाची अंमलबजावणी करत बुधवार दि. 27 रोजी गावातील रिद्धी प्रदीप कदम व सिध्दी प्रदीप कदम या दोन मुलींच्या नावे पोस्ट ऑफिसमध्ये सदरील योजनेचे खाते काढून पहिल्या हप्त्यापोटीची रक्कमेचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच या मुलीचे पहिले पाच हप्ते ग्रामपंचायतमार्फत भरण्यात येणार आहेत. त्यामुळे पांगरदरवाडी ग्रामपंचायतच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. केंद्र सरकारद्वारे सुरु करण्यात आलेली “बेटी बचाव बेटी पढाओ“ अंतर्गत मुलींसाठी ही एक महत्वकांक्षी व सर्वात कमी गुंतवणूकीची सुकन्या समृध्दी योजना असून मुलींचे शिक्षण, आरोग्य, मुलीचे लग्न तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक अतिशय फायदेशीर बचत योजना आहे. रिद्धी व सिध्दी प्रदीप कदम यांच्या वयाच्या 21 वर्षी मोठी रक्कम परतावा म्हणून मिळणार आहे. या योजनेत दोन मुलींचे नावे समाविष्ट करुन त्यांचे हप्ते भरण्यास सुरुवात केल्याने पांगरदरवाडी ग्रामपंचायतचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


 
Top