कळंब (प्रतिनिधी)-विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची लालच दाखवत विरोधात निर्णय देण्यास लावला आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख मीच आहे. शिवसेना व आमच्या सोबतचे निष्ठावंत शिवसैनिक हिच माझी खरी संपत्ती आहे. ही संपत्ती कुणीही हिरावून घेवू शकत नाही असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कळंब येथे केले.

कळंब शहरातील बाजार समिती आवारात जनसंवाद सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार संजय राऊत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रणजीत पाटील, तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार आदी उपस्थित होते.

370 कलम काढल्यानंतर जम्मू काश्मीर मोकळा श्वास घ्यायला लागले आहे असे विधान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मग मागील पाच वर्षात काश्मीरमध्ये निवडणूक का घेतली नाही? असा सवाल ठाकरे यांनी केला. महाराष्ट्राच्या हक्काचे उद्योग गुजरातमध्ये गेले. मग महाराष्ट्राने फक्त राम राम म्हणत घंटा वाजवायची का? आमचे घंटा वाजवणारे हिंदूत्व नाही, ह्दयात राम हाताला काम हे आमचे हिंदूत्व आहे. माझ्या शिवसैनिकांना तडीपार करता का? या निवडणुकीत मतदार भाजपाला मुळासकट उपटून तडीपार केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.


 
Top