धाराशिव (प्रतिनिधी)- मराठा समाजाला कायमस्वरुपी टिकणारे आरक्षण ओबीसीमधून मिळावे, त्याचबरोबर सगेसोयऱ्यांच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी याकरिता संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली लोकशाही मार्गाने लढा सुरु असताना सरकारने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सरकारच्या विरोधातील उद्रेक आता लोकसभा निवडणुकीत दाखवून देणार आहोत. म्हणून धाराशिव लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाचे एक हजाराहून अधिक उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी (दि.17) पत्रकार परिषदेत देण्यात आली.

मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आगामी लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट करण्यात आली. यावेळी लोकसभेचे उमेदवार बलराज रणदिवे, अक्षय नाईकवाडी, निखील जगताप, अभिजित सूर्यवंशी, अमोल जाधव, संकेत सूर्यवंशी, रणधीर सूर्यवंशी, प्रतिक बारकुल, सुधीर पवार व इतर समाजबांधव उपस्थित होते. आचारसंहिता लागू झाली तरी आंदोलकांना नोटिसा बजावून गुन्हे दाखल करुन समाजात दहशत माजविण्याचे काम सरकार करत आहे. 


 
Top